मातोश्री पाणंद रस्ते योजनेसह प्रलंबित देयकांबाबत आ. सुरेश धस यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे मागणी

मातोश्री पाणंद रस्ते योजनेसह प्रलंबित देयकांबाबत आ. सुरेश धस यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे मागणी
आष्टी प्रतिनिधी :
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांची आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामे व रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी आमदार धस यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी मातोश्री पाणंद रस्ते योजना ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगत, या योजनेतून हजारो किलोमीटर वस्ती रस्ते व शेतरस्त्यांची कामे सुरू असल्याची माहिती दिली. मात्र, या कामांची कुशल देयके व राज्य रोजगार हमी निधी प्रलंबित असल्याने संबंधित निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच जलसिंचन विहीर, शेततळे, गायगोठा, शेळीपालन शेड यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या कामांवरील मर्यादांमुळे अनेक शेतकऱ्यांची कामे पूर्ण होऊनही देयके रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंतीही त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.
याशिवाय रोजगार हमी योजनेतील प्रलंबित कुशल देयके तातडीने अदा करावीत तसेच रोजगार सेवक, ग्रामसेवक व संबंधित यंत्रणांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही आमदार धस यांनी केली.
शेतकरी, कामगार व ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, या सर्व प्रलंबित विषयांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.



