बीड

गणपतीपुळेच्या लाटांनी गिळले बिडकीनचे पाच तरुण; एकाचा मृतदेह सापडला, चौघांसाठी जीवाची घालमेल

गणपतीपुळेच्या लाटांनी गिळले बिडकीनचे पाच तरुण; एकाचा मृतदेह सापडला, चौघांसाठी जीवाची घालमेल
समुद्रकिनारी आनंदाचा क्षण ठरला काळाचा घाला; आई-वडिलांचा आक्रोश, बिडकीन गावावर शोककळा
पैठण / किरण काळे
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी आज दि.२० जुन शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने बिडकीनसह संपूर्ण पैठण तालुका हादरून गेला आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तरुणांना समुद्राच्या रौद्र लाटांनी अक्षरशः गिळंकृत केले. यापैकी एका तरुणाचा मृतदेह दुपारी किनाऱ्यावर सापडला असून, उर्वरित चौघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवरील मोहीम सुरू आहे.
घटनेची माहिती गावात पोहोचताच बिडकीन परिसरात शोककळा पसरली. आपल्या लेकरांच्या प्रतिक्षेत असलेल्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडल्याने वातावरण हेलावून गेले. प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न होता –  “आपली मुलं परत येणार का?”
मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन (ता. पैठण) येथून १९ जणांचा तरुणांचा गट गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास गटातील आठ जण समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील तीव्र प्रवाह आणि उंच लाटांचा अंदाज न आल्याने क्षणात परिस्थिती हाताबाहेर गेली. आठपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले, तर पाच जण समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले.
बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे.
पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि जीवरक्षकांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात धाव घेतली. अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्रातील प्रबळ करंट आणि उसळणाऱ्या लाटांमुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
दरम्यान, दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास प्रेम दीपक आदमाने यांचा मृतदेह मालगुंड किनाऱ्यावर आढळून आला. ही बातमी समजताच नातेवाईकांचा आक्रोश अनावर झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
समुद्रातील प्रबळ प्रवाहामुळे उर्वरित चौघांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत असले तरी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम राबवत आहेत. संपूर्ण रत्नागिरी प्रशासन या मोहिमेत झटत असून प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानला जात आहे.
आमदार विलास भुमरे यांची तत्परता प्रशासनाला तातडीच्या सूचना
दुर्घटनेची माहिती मिळताच पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी तात्काळ रत्नागिरीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. बेपत्ता तरुणांचा शोध वेगाने घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आनंदाच्या सहलीवर काळाचा घाला
मित्रांसोबत आनंदाचे क्षण टिपण्यासाठी निघालेली ही सहल काही क्षणांतच शोकांतिकेत बदलली. घरातून हसत-खेळत बाहेर पडलेले तरुण आज समुद्राच्या अथांग लाटांमध्ये बेपत्ता झाले असून, त्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आता फक्त अश्रू आणि आशेची एक क्षीण किरण उरली आहे. गणपतीपुळेच्या लाटांनी बिडकीनच्या पाच कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळविला असून, संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

Back to top button