बीड
पुन्हा एकदा कागदोपत्री वृक्षलागवडीत बीड जिल्ह्याला पुरस्कार पटकावण्याची संधी; २९ लाख रोपे आहेत का? : डॉ. गणेश ढवळे

पुन्हा एकदा कागदोपत्री वृक्षलागवडीत बीड जिल्ह्याला पुरस्कार पटकावण्याची संधी; २९ लाख रोपे आहेत का? : डॉ. गणेश ढवळे
बीड, दि. १० : बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या वृक्षलागवड मोहिमेतील दाव्यांबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असतानाच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “पुन्हा एकदा कागदोपत्री वृक्षलागवड करून पुरस्कार पटकावण्याची संधी बीड जिल्ह्याला मिळाली आहे,” अशी उपरोधिक टीका केली आहे.
डॉ. ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७ ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात ३० लाख वृक्षांची लागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी १० टक्के झाडेदेखील आज जिवंत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मोहिमेसाठी सुमारे ४२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी अनेकदा चौकशीची मागणी करत आंदोलने केली. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेत आमदार चेतन तुपे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी बीड जिल्ह्यात एका दिवसात ३० लाख आणि एकूण ६३ लाख वृक्षांची लागवड झाल्याचे तसेच त्यापैकी ९६ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सांगितले होते. तर माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार ७० लाख वृक्ष लागवड झाल्याचे नमूद करण्यात आले असल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला आहे.
“लागवड झालेल्या वृक्षांच्या संख्येबाबत विविध आकडे समोर येत असल्याने सरकारची दिशाभूल केली जात असल्याचा संशय निर्माण होतो,” असे ते म्हणाले.
राष्ट्रीय वन धोरण १९८८ च्या उद्दिष्टानुसार सन २०४७ पर्यंत राज्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी राज्यात ३०० कोटी वृक्षारोपण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातही व्यापक वृक्षलागवडीची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विविध विभागांना उपलब्ध जमिनीचे नियोजन करून वृक्षलागवड करण्याच्या सूचना दिल्या असून, लागवडीनंतर पुढील दहा वर्षे वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. ढवळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “जिल्हा प्रशासनाकडे प्रत्यक्षात २९ लाखांहून अधिक रोपे उपलब्ध आहेत का?” प्रशासनाच्या माहितीनुसार सामाजिक वनीकरण विभागाकडे २० लाख तर प्रादेशिक वन विभागाकडे ९.५० लाख अशी एकूण २९.५० लाख रोपे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच “एक शाळा – एक विद्यार्थी – एक झाड” हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचेही प्रशासनाकडून अधोरेखित करण्यात आले आहे.



