बीड
आडत मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचे अतिक्रमण राजरोस भिंती फोडल्या,शेड उभारले ! नगरपरिषद प्रशासनाला मोतिबिंदू झालाय काय? :- डॉ.गणेश ढवळे

आडत मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचे अतिक्रमण राजरोस भिंती फोडल्या,शेड उभारले ! नगरपरिषद प्रशासनाला मोतिबिंदू झालाय काय? :- डॉ.गणेश ढवळे
बीड (दि.२१) : बीड शहरातील आडत मार्केट परिसरात नगरपालिकेच्या जागेवर व्यापाऱ्यांनी भिंती फोडुन अनधिकृत पत्राशेड उभारून अतिक्रमण केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. भाजी मंडईतील लहान व्यावसायिकांवर कारवाई करणारे नगरपरिषद प्रशासन आडत मार्केटमधील धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे मात्र डोळेझाक करत असल्याने नगरपरिषद प्रशासनाला मोतिबिंदू झालाय का? अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे यांनी दिली.
डॉ. ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगरपालिकेने आडत मार्केटमधील गाळे भाडे तत्वावर दिलेले असताना काही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या भिंती फोडून त्या ठिकाणी बेकायदेशीर पत्राशेड उभारले आहेत. दिवसाढवळ्या तोडफोड करून नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले असून मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
“भाजी व फळ विक्रेत्यांवर दांडगाई करणाऱ्या प्रशासनाला हे अतिक्रमण दिसत नाही काय? मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना मोतिबिंदू झालाय का?” असा संतप्त सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
नोटीसनंतरही कारवाई शून्य
नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांनी दि.७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित सहा व्यापाऱ्यांना चार दिवसांत अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र महिनाभराहून अधिक कालावधी उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
नोटीस देणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही काही व्यापाऱ्यांकडून राजकीय पाठबळाच्या जोरावर अरेरावीची भाषा केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याचेही डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.
— डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं. ८१८०९२७५७२



