बीड

श्रीवर्धनमध्ये पाणी प्रश्न पेटला! निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी प्रशासन गोत्यात; १ मे रोजी शिवसेनेचा एल्गार

श्रीवर्धनमध्ये पाणी प्रश्न पेटला! निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी प्रशासन गोत्यात; १ मे रोजी शिवसेनेचा एल्गार

श्रीवर्धन (संदेश घोलप):“पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,” अशी आक्रमक भूमिका घेत श्रीवर्धनमधील पाणी प्रश्नाने आता रौद्र रूप धारण केले आहे. शहरातील कोलमडलेली पाणीपुरवठा व्यवस्था, वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईन आणि प्रशासनाचा निर्ढावलेला कारभार यांविरोधात आता थेट रणशिंग फुंकण्यात आले आहे. १ मे – महाराष्ट्र दिनी श्रीवर्धन नगरपरिषदेसमोर होणाऱ्या या लाक्षणिक उपोषणामुळे शहरभर संतापाची लाट उसळली आहे.पाणी योजनेचा खेळखंडोबा; जनतेच्या पैशाची होळी?श्रीवर्धन शहरासाठी राबवण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. नवीन पाईपलाईन टाकताना केलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरात जागोजागी गळती लागली आहे. “लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असताना, नागरिकांच्या नळाला मात्र दोन-दोन दिवस ठणठणाट असतो, हा कसला विकास?” असा संतप्त सवाल शिवसेनेच्या वतीने विचारण्यात आला आहे.गढूळ पाणी की ‘विष’? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! केवळ पाण्याचा तुटवडाच नाही, तर पुरविले जाणारे पाणी हे पिण्यायोग्य नसून अत्यंत अशुद्ध आणि गढूळ आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली असून, जनतेच्या जीवाशी हा खेळ खेळला जात असल्याची टीका होत आहे. विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप अधिकच तीव्र आहे.प्रशासनाला ‘जाहीर नोटीस’ – आता माघार नाही!नगरसेवक व गटनेते देवेंद्र पांडुरंग भुसाणे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की, वारंवार निवेदने देऊनही झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जनतेचा हिसका दाखवण्याची वेळ आली आहे. या आंदोलनात नगरसेवक संतोष वेश्वीकर, नगरसेविका सलोनी स्वरूप मोहित आणि शहरप्रमुख सावन तवसाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. जर या उपोषणानंतरही प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आंदोलनाची रूपरेषा:

​ठिकाण: श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय.

​दिनांक: १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन).

​वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत.

Back to top button