बीड
निर्भिड सामाजिक योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ. गणेश ढवळे सन्मानित

निर्भिड सामाजिक योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ. गणेश ढवळे सन्मानित
बीड : (दि.२३)शेतकरी, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, भ्रष्टाचार निर्मूलन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून अनोख्या लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना “क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भिड सामाजिक योद्धा पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले.
युवा लोकमित्रच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त दि.२० जून रोजी ताज पॅलेस, बार्शी नाका, बीड येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे, ज्येष्ठ पत्रकार भागवत तावरे, रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत आणि पत्रकार संघाचे वैभव स्वामी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन डॉ. गणेश ढवळे यांचा गौरव करण्यात आला.
सामाजिक आंदोलनातील सहकारी शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ, रामधन जमाले, धनंजय सानप आदी सहकारी यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. गणेश ढवळे म्हणाले, *”हा सन्मान माझा एकट्याचा नसून सामाजिक चळवळीतील सहकाऱ्यांच्या संघर्षाचे आणि जनतेच्या विश्वासाचे फळ आहे.”*
डॉ. गणेश ढवळे यांच्या कार्याबद्दल विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



