बीड
संघटना मजबूत असेल तरच समाजाचे प्रश्न सुटतील: छगन भुजबळ

संघटना मजबूत असेल तरच समाजाचे प्रश्न सुटतील: छगन भुजबळ
जामखेडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे जंगी स्वागत
जामखेड प्रतिनिधी :
शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ जामखेड दौऱ्यावर आले असता महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांचे उत्साहपूर्ण व जंगी स्वागत करण्यात आले.
शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी, फलक आणि घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला होता. मंत्री भुजबळ यांच्या आगमनावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फेटे, पुष्पहार आणि गुलाल उधळत जोरदार स्वागत केले. “ओबीसी समाजाचा विजय असो”,छगन भुजबळ आगे बढो अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, की ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सातत्याने लढा दिला असून पुढेही तो कायम राहील. तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही आपली जबाबदारी आहे. संघटना मजबूत केल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, समाजकारण करताना सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेणे गरजेचे आहे. सामाजिक ऐक्य आणि समतेच्या आधारावरच सर्वांगीण विकास साधता येतो. तरुणांनी पुढाकार घेऊन नेतृत्व स्वीकारावे आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन म्हेत्रे, तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, शहराध्यक्ष राजू शेलार, कार्यकारिणी सदस्य महेश थोरात, प्रवक्ते डॉ. नागेश गवळी, आरिफ सय्यद, शरद म्हेत्रे, अन्सार सय्यद, माऊली राळेभात, अजिंक्य यादव, संजय बेलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


