बीड
देवदुत ओमप्रकाश शेटे यांनी शाळेसाठी पुढाकार घेऊन चिमुकल्यांसाठी संजीवनी बनावं ! काळेगाव थडी जिल्हा परिषद शाळा मरणासन्न अवस्थेत ; झाडाखाली भरतेय वर्ग : – डॉ. गणेश ढवळे

देवदुत ओमप्रकाश शेटे यांनी शाळेसाठी पुढाकार घेऊन चिमुकल्यांसाठी संजीवनी बनावं ! काळेगाव थडी जिल्हा परिषद शाळा मरणासन्न अवस्थेत ; झाडाखाली भरतेय वर्ग : – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.१२): माजलगाव तालुक्यातील काळेगाव थडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारत कधीही कोसळण्याची भीती असल्याने सध्या विद्यार्थ्यांचे वर्ग झाडाखाली भरत असल्याची गंभीर परिस्थिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू देवदुत म्हणून ओळखले जाणारे ओमप्रकाश शेटे यांनी या शाळेसाठी ‘देवदूत’ ठरून नव्या इमारतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी बनावं अशी मागणी केली आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असुन नविन शाळा इमारतीसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.
—
१९६३ ची इमारत; जीवघेणी परिस्थिती
शाळेची इमारत १९६३ साली विटा आणि चुन्यापासून बांधलेली असून सध्या ती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. भिंतींना मोठे तडे गेले आहेत, पत्रे गंजून गळती होत आहे, तसेच सिमेंटचे खपले कोसळत आहेत. अनेकदा वर्गात साप व विंचू आढळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
“इमारत कधी कोसळेल याचा नेम नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसवून शिक्षण द्यावे लागत आहे. वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही,” अशी खंत मुख्याध्यापक बाळासाहेब काकडे यांनी व्यक्त केली.
—
मुलभूत सुविधांचा अभाव
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आगाजी तौर यांनी सांगितले की,
पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही
शौचालयांची कमतरता
पोषण आहारासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह नाही
या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
—
“ज्ञान मंदिराकडेही लक्ष द्यावे”
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी, शुक्लतीर्थ व वांगी देवस्थानांच्या विकासासाठी ओमप्रकाश शेटे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांसारख्या “ज्ञान मंदिरां”कडेही लक्ष देऊन काळेगाव थडीसह इतर जीर्ण शाळांच्या इमारतींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.



