बीड

भारतीय मूर्तिशास्त्र आणि स्थापत्यकला यांचे संवर्धन होणे ही काळाची गरज :  अरविंद सोनटक्के

भारतीय मूर्तिशास्त्र आणि स्थापत्यकला यांचे संवर्धन होणे ही काळाची गरज :  अरविंद सोनटक्के

सौ. केएसके महाविद्यालयात ‍’शिल्पस्पर्श’ – भारतीय मूर्तिशास्त्र आणि स्थापत्य या विषयावरील एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

बीड ( प्रतिनिधी ) भारतीय मूर्तिशास्त्र आणि प्राचीन स्थापत्यकला यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने इतिहास वाचता येतो. इतिहासातील अनेक अबोध घटना प्रसंगाचे आणि सांस्कृतिक घडामोडींचे अन्वयार्थ लावता येतात. त्यामुळे प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्राचे आणि स्थापत्यकलेचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के यांनी केले. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सौ. के.एस. के. महाविद्यालय बीड आणि भारतीय मूर्ती व स्थापत्य संशोधन परिषद , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिल्पस्पर्श’ – भारतीय मूर्तिशास्त्र आणि स्थापत्य या विषयावरील एकदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव तथा ख्यातनाम लेखिका डॉ. दिपा क्षीरसागर प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, इतिहास अभ्यासक डॉ. कामाजी डक, डॉ. शांता जाधवर, उपप्राचार्य तथा कार्यशाळेच्या संयोजक डॉ. अनिता शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले, ” मूर्तिकला, शिल्पकला अथवा स्थापत्य या केवळ दगडात कोरलेल्या मूर्ती अथवा शिल्प नसतात. तर त्यामध्ये त्या कलावंताने आपला जीव ओतलेला असतो. त्यामुळे त्यांना सेंद्रीयत्व प्राप्त झालेले असते. या मुर्ती आणि शिल्प यांना स्वतःचे म्हणून एक प्रमाण असते. ओळख असते. गतकाळात घडून गेलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांची उकल आपणास यातून होत असते. इतिहासातील अनेक नवे सांस्कृतिक-ऐतिहासिक संदर्भ  यामुळे नव्या अर्थबोधासह आपल्याला माहीत होत असतात. आपला हा ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा आहे. या वारशामुळेच आपली जगाला ओळख होत असते. यामुळे या ऐतिहासिक घटकांचे संवर्धन होणे महत्त्वाचे ठरते.

या कार्यशाळेच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. दीपा क्षीरसागर यावेळी बोलताना म्हणाल्या की, ” मूर्ती आणि शिल्प ही केवळ सौंदर्याची  प्रतिकं नसून ते भारतीय इतिहासातील महत्त्वाचे पुरावेदेखील आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना आणि एक भारतीय नागरिकांना याची माहिती असायला हवी. ज्यांना स्वतःचा इतिहास ज्ञात नसतो ते नवीन इतिहास घडवू शकत नाहीत. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी आणि जागरूक नागरिकांनी इतिहासाकडे आस्थेवाईकपणे पाहण्याची गरज आहे.

यावेळी मांडणी करताना इतिहास अभ्यासक डॉ. शांता जाधवर यांनी स्रीशिल्पांचे अन्वयार्थ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. कामाजी डक यांनी बीड जिल्ह्यातील मंदिरांचे स्थापत्य या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी केला. यावेळी त्यांनी प्रमुख व्याख्यात्यांच्या मांडणीवर मार्मिक भाष्य करून ऐतिहासिक वारशांच्या जतन आणि संवर्धनाचीगरज लक्षात आणून दिली.

या कार्यशाळेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.काकडे नारायण, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान एस एस, कार्यशाळेचे सहसंयोजक  प्रा. संजय काळे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शहरातील मूर्ती कलेचे प्रेमी आणि अभ्यासक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल चव्हाण या विद्यार्थिनीने केले आणि आभार प्रदर्शन प्रा. संजय काळे यांनी केले

Back to top button