बीड

प्रभु श्रीराम जन्मोत्सवातुन हिंदू ऐक्याचा विराट हुंकार

प्रभु श्रीराम जन्मोत्सवातुन हिंदू ऐक्याचा विराट हुंकार
*सकाळी भव्य मोटारसायकल रॅली तर सायंकाळी भव्यदिव्य शोभायात्रा*
दि. 26 (बीड प्रतिनिधी) – हिंदूंचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या श्रीराम नवमी निमित्त बीड शहर आज पूर्णपणे भगवामय होणार असून, हिंदुत्वाचा विराट हुंकार देणारी भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा सुवर्णवर्ष असल्याने हा उत्सव अधिक दिमाखदार, उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
दि. 26 मार्च रोजी सकाळी ९ वाजता गणपती मंदिर, बार्शी नाका येथून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत हजारो युवक भगवे झेंडे, जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडणार असून, हिंदुत्वाच्या एकतेचे आणि शक्तीचे भव्य दर्शन घडणार आहे. रॅली गणपती मंदिर येथून निघून कंकालेश्वर मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ), शिवराज पान सेंटर, केएसके कॉलेज, तुळजाई चौक, नगरनाका, भगवानबाबा चौक, अंबिका चौक, साठे चौक, मोंढा रोड मार्गे पुन्हा कंकालेश्वर मंदिर येथे समारोप होणार आहे.
तसेच दुपारी ४ वाजता कंकालेश्वर मंदिर येथून महाराष्ट्रात प्रथम निघालेली आणि संपूर्ण भारतात गाजलेली भव्यदिव्य श्रीराम शोभायात्रा निघणार असून, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, आकर्षक देखावे, आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि जोशपूर्ण होणार आहे. ही शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आरती करून संपन्न होणार आहे.
हिंदू एकतेचे आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन असलेल्या या सोहळ्यात जास्तीत जास्त रामभक्तांनी सहभागी होऊन हिंदुत्वाचा अभिमान व्यक्त करावा, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button