लोककलांनी संस्कृती जतन करुन ठेवली आहे ः प्रो. डॉ. गणेश चंदनशिवे

लोककलांनी संस्कृती जतन करुन ठेवली आहे ः प्रो. डॉ. गणेश चंदनशिवे
लोककला संवर्धन आणि जतन राष्ट्रीय कार्यशाळेचे
सौ. के.एस.के. महाविद्यालयात उद्घाटन संपन्न
बीड (प्रतिनिधी) ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग व संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोककला संवर्धन आणि जतन या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गणेश चंदनशिवे विभाग प्रमुख लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. दीपाताई क्षीरसागर तथा अध्यक्ष अखिल भारतीय नाटय परिषद, शाखा बीड या होत्या.
याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात डॉ. गणेश चंदनशिवे यांनी लोककलांनी संस्कृती जतन करुन ठेवली असून हा लोकसंस्कृतीचा ढोलारा लोक कलावंतानी भक्तीच्या जोरावर संस्कृतील जतन करुन ठेवले असून महाराष्ट्रात देव देवतांची विविध पीठे असून त्यात तुळजाभवानी तुळजापुर, रेणुका माहुरगड, सप्तश्रृंगी वणी, कोल्हापुरची अंबाबाई, अंबाजोगाईची अंबा या देवतांची अनेक प्रकारचे आख्याने उपलब्ध असून लोककलावंतानी त्या जतन करुन ठेवल्या आहेत. वारकरी संतानी समतेचा धागा धरुन अभंग, भारुड, गवळणी इत्यादींच्या माध्यमातून भक्ती रंजक पध्दतीने सांगीतली आहे. या लोककला मधून लोककलांचे संवर्धन व जतन होत आहेे. याप्रसंगी त्यांनी अनेक कवने गाऊन रसिकांची मने जिंकली. लोककलांच्या व कलावंताच्या जगण्यासाठी काहीतरी उपाययोजना झाली पाहीजे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. दीपा क्षीरसागर यांनी लोककला मधून आपली संस्कृती सातत्याने जतन व संवर्धन करुन ठेवण्याचे काम लोककलेच्या उपासकांनी केले आहे. या लोककलांच्या सादरीकरणाला पारंपारीक लोक कलावंतानी जतन करुन ठेवले असून त्यांना काही प्रमाणात अखिल भारतीय नाटय परीषदेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक कलावंताना मदत करणे, त्यांच्या कला जतन करुन ठेवण्यासाठी विविध प्रकारची प्रशिक्षण केंद्र उभारली पाहीजेत, त्यांच्या कला संवर्धनासाठी केंद्राची उभारणी झाली पाहीजे. ज्यापध्दतीने अध्यात्मीक शिक्षण देऊन लोककलावंत निर्माण होत आहेत त्याचप्रमाणे लोककला जतन करण्यासठी पुढील पिढीला लोककला लोप न पावता लोककलावंताची पुढील पिढी जगली पाहिजे त्यासाठी बालरंगभुमीच्या वतीने बालकांसाठी लोककलांचे सादरीकरण व संवर्धन झाले पाहीजे यासाठी सातत्याने लोककला शिबीरांचे आयोजन केले जाते. डॉ. दिपाताई क्षीरसागर यांनी याप्रसंगी कौटुंबीक लावणी नेहमीच राया तुमची घाई ही गायन करुन उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत विभागाच्या वतीने पोवाडा गाऊन प्रमुख अतिथींचे स्वागत केले तसेच उद्घाटक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी गण गायन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉ. जयंत शेवतेकर यांनी मराठवाड्यातील लोककला प्रकारांचे संपुर्ण मराठवाडयात गोंधळ, भारुड, जागरण, वासुदेव, पोतराज, आंबेडकरी जलसा, तमाशा या विविध लोककलावंताच्या मुलााखती, अनुभव त्यांची होत असणारी उपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी या राष्ट्रीय कार्यशाळेत 150 पर्यंत संशोधक , सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक यांनी सहभाग घेतला असून त्यात 75 शोधनिबंध प्राप्त झाले असून या लोककला संवर्धन आणि जतन राष्ट्रीय कार्यशाळेत 45 तज्ञ कलावंत, मार्गदर्शक आपल्या लोककला सादरीकरण व त्यावर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. जयंत शेवतेकर , डॉ. साहिश देशपांडे, प्रा. गणेश शिंदे, डॉ. सुधिर निकम, श्री हमीद अमीन सय्यद, श्री भगवान राऊत, श्री धर्मा कांबडे किंगरीवादक, शाहीर संतोष साळुंके, शाहीर विलास सोनवणे, लोकवाद्य, लोकसंगीत सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. ए. एस. खान, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. राहुल सोनवणे, प्रा. दिपक जमदाडे, डॉ. दुष्यंता रामटेके, प्रा. विजयकुमार राख, डॉ. अस्लम शेख, प्रा. सुरेश थोरात, प्रा. पवन शिंदे, प्रा. इंद्रजित भांगे हे परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दुष्यंता रामटेके व आभार डॉ. राहुल सोनवणे यांनी केले.



