बीड
मोतीलाल ओसवाल यांच्या पुढाकारातून रुजणार कृषिक्रांतीचे बीज!

मोतीलाल ओसवाल यांच्या पुढाकारातून रुजणार कृषिक्रांतीचे बीज!
ग्लोबल विकास ट्रस्ट आणि AU SMALL FINANCE बँकेचा शेतकऱ्यांना मिळणार भक्कम आधार
© (लेखक – दत्तात्रय काळे – 9558488686)
मराठवाडा… दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या सततच्या लहरीपणाशी झुंज देणारा हा प्रदेश. येथे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर जिवंत राहण्यासाठीची झुंज आहे. कधी पाण्याअभावी पिके करपतात, तर कधी अतिवृष्टीने उभे पीक वाहून जाते. अशा संकटांच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी लागणारे भांडवल मात्र नेहमीच अपुरे पडते. परिणामी, शेतकरी कर्जबाजारी होतो आणि विकासाचे स्वप्न अपुरेच राहते. हीच वेदना ओळखून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवे परिवर्तन घडवण्यासाठी मोतीलाल ओसवाल समूहाने एक धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “शेतकरी कर्ज फेडत नाहीत” हा बँकिंग क्षेत्रात रुजलेला गैरसमज मोडीत काढण्याचा हा प्रयत्न ठरतो आहे. जर शेतकरी परिस्थितीमुळे कर्जफेड करू शकला नाही, तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असा विश्वास बँकेला देत प्रत्यक्ष कृतीत उतरवलेली ही योजना आज परिवर्तनाची बीजे रोवत आहे.
ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी मराठवाड्यात शाश्वत शेतीसाठी अनेक उपक्रम राबवले. जलसंधारणामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आणि शेतकरी केळी, आंबा, सीताफळ, पपई यांसारख्या फळपिकांकडे तसेच तुती लागवडीसारख्या उद्योगांकडे वळू लागले. मात्र, वर्षानुवर्षांच्या आर्थिक संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी नव्या सुरुवातीसाठी लागणारे भांडवल उपलब्ध करणे ही मोठी अडचण होती. ही परिस्थिती मयंक गांधी यांनी मोतीलाल ओसवाल समूहाचे कार्यकारी संचालक रामदेव अग्रवाल यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकताच त्यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला. AU SMALL FINANCE बँकेत शेतकऱ्यांच्या कर्जासाठी कोट्यवधी रुपयांची सुरक्षा ठेव जमा करण्यात आली. त्यामुळे बँकांना कर्ज देताना धोका उरत नाही आणि शेतकऱ्यांसाठी कर्जाची दारे खुली झाली. आज बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी विनातारण कर्ज मिळू लागले आहे. येत्या काळात हजारो शेतकरी केळी लागवड आणि रेशीम शेतीकडे वळणार असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. ग्लोबल विकास ट्रस्टने आतापर्यंत ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम केले आहे. सुमारे ४ हजार गावांपर्यंत पोहोचलेल्या या उपक्रमातून ७ कोटींपेक्षा जास्त फळझाडांची लागवड झाली आहे. पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न हा दुहेरी लाभ आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे.
आज शेतकऱ्यांसाठी “शून्य गुंतवणूक, नव्या आशेची शेती” ही केवळ कल्पना राहिलेली नाही, तर प्रत्यक्षात साकार होणारे स्वप्न आहे. मोतीलाल ओसवाल समूह, AU SMALL FINANCE बँक आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवा उजेड पसरू लागला आहे. मराठवाड्याच्या मातीला पुन्हा एकदा हिरवाईची आणि समृद्धीची चाहूल लागली आहे आणि कदाचित, हीच खरी कृषीक्रांतीची सुरुवात असेल. वर्षानुवर्षे दारिद्र्याच्या खाईत जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्याची जल नायक मयंक गांधी यांची ही संकल्पना नक्कीच यशस्वी ठरेल.



