कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोराळेंच्या बदलीविरोधात तीव्र संताप;बदली तात्काळ रद्द करा

कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोराळेंच्या बदलीविरोधात तीव्र संताप;बदली तात्काळ रद्द करा
जामखेड । प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालयातील ढासळलेली आरोग्यव्यवस्था अल्पावधीत सावरून रुग्णसेवेला शिस्त,पारदर्शकता व कार्यक्षमतेचा नवा आयाम देणाऱ्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोरळे यांची अचानक बदली करून घेण्यास भाग पडल्याने समस्त नागरिक,रुग्ण व सामाजिक घटकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.सदर बदली ही प्रशासकीय निकषांपेक्षा काही मोजक्या कामचुकार व गैरप्रकार करणाऱ्या घटकांच्या दबावातून झाल्याचा गंभीर आरोप होत आहे.
सदर वैद्यकीय अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी गैरहजेरी, अनावश्यक रेफरल,औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव व आर्थिक अनियमितता यावर ठोस कारवाई करत रुग्णालयाची शिस्तबद्ध घडी बसवली होती.ओपीडी,आयपीडी,प्रसूती व आपत्कालीन सेवा वेळेत व प्रभावीपणे सुरु करून रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यात आला होता.औषध व वैद्यकीय साहित्याचा नियमित साठा उपलब्ध करून देत रुग्णालय स्वच्छता,बायो-मेडिकल वेस्ट व्यवस्थापन व संसर्ग नियंत्रणाबाबत नियमबाह्य प्रकारांना आळा घालण्यात आला. परिणामी रुग्णालयाबाबत जनतेचा विश्वास लक्षणीयरीत्या वाढला होता.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेची काटेकोर अंमलबजावणी करत बनावट लाभ व गैरवापर रोखण्यात आला.आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणून अपहार व कमिशनखोरीसारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात आले.या कठोर पण आवश्यक निर्णयांमुळे काही मुरोज,स्वार्थी व शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण झाली होती.याच पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने व दबावातून बदलीचा प्रस्ताव पुढे आल्याचा आरोप होत असून ही बदली तात्काळ रद्द न झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णसेवा पुन्हा पूर्ववत अनागोंदीकडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना स्वतःहुन बदली करण्यासाठी भाग पाडले जात असेल तर हे शासनाच्या सुशासन धोरणाला विरोधात जाणारे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जनहित,रुग्णसेवेचा दर्जा व प्रशासकीय स्थैर्य लक्षात घेता सदर वैद्यकीय अधीक्षकांची बदली तात्काळ रद्द करून त्यांचा प्रशासकीय कार्यकाळ जामखेड ग्रामीण रुग्णालयात पूर्ण करू देण्याची जोरदार मागणी होत आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही युवक क्रांती दल,सौमित्र प्रतिष्ठान,सामाजिक व आरोग्यप्रेमी संघटनांकडून देण्यात आला आहे.निवेदनावर युवक क्रांती दलाचे अध्यक्ष योगेश अब्दुले,सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद,अनिल जावळे, सुर्यक्रांत सदाफुले,अनिल घोगरदरे,ॲड.हितेश राजगुरू,सोनू वाघमारे,शहाजी राळेभात,संभाजी राळेभात,नय्यूम शेख,सुरेश आव्हाड आदींच्या सह्या आहेत.



