स्त्रीशक्तीचा गौरव; नवोपक्रम स्पर्धेत सारिका धामोळे प्रथम

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;
अंजनगाव सुर्जी: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२५–२६ चा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून, अमरावती जिल्ह्यातील पूर्व-प्राथमिक गटातून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा येथील अंगणवाडी सेविका सौ. सारिका ज्ञानदेव धामोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), अमरावती यांच्या मार्फत ही स्पर्धा घेण्यात आली होती. पूर्व-प्राथमिक स्तरावर नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबवणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दोन फेऱ्यांत मूल्यमापन करण्यात आले.
सौ. सारिका धामोळे यांचा “खेळातून शिक्षण व संस्कार” या विषयावर आधारित नवोपक्रम पहिल्या फेरीत निवडला गेला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांनी प्रभावी सादरीकरण करत आपल्या कल्पकतेच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यांच्या या यशामुळे त्यांचा उपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
सौ. सारिका धामोळे या केवळ अंगणवाडी सेविका नसून त्या सामाजिक कार्यकर्त्या असून उडान महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत. यापूर्वीही त्यांच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी पत्राद्वारे कळविले असून, जिल्हास्तरीय विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ लवकरच आयोजित केला जाणार आहे. त्याबाबतची माहिती स्वतंत्र पत्राद्वारे दिली जाणार आहे.
सौ. सारिका धामोळे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे दहीगाव रेचा गावाचे तसेच संपूर्ण अंजनगाव सुर्जी तालुक्याचे नाव शिक्षण क्षेत्रात उज्वल झाले आहे.



