युवा अधिवेशनातून शहरविकासाला दिशा देण्याची गरज; – श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी – अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सत्ता स्थापनेनंतर शहराचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी एक महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल उचलण्याची गरज आहे. प्रत्येक प्रभागातून दोन ते तीन समाजातील जागरूक युवक व युवतींची निवड करून दर तिमाही नगरपरिषद हॉल मध्ये ‘युवा अधिवेशन’ भरविण्यात यावे, अशी मागणी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीकांत नाथे यांनी केली आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागाच्या समस्या, गरजा व स्थानिक प्रश्न युवकांच्या माध्यमातून थेट मांडले गेले तर त्यावर प्रभावी उपाययोजना करता येऊ शकतात. युवक-युवती हे समाजातील सर्वात सक्रिय घटक असून त्यांची ऊर्जा, विचारशक्ती व प्रत्यक्ष अनुभव प्रशासनासाठी उपयोगी ठरू शकतात.
युवा अधिवेशनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यसनमुक्ती आदी विषयांवर सखोल चर्चा होऊन सूचना व उपाय सुचवता येतील. यामुळे नगरपरिषद प्रशासनाचे काम हलके होऊन लोकसहभागातून विकासाची गती वाढेल, असा विश्वास श्रीकांत नाथे यांनी व्यक्त केला आहे.
शहराच्या भविष्यासाठी युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे ही काळाची गरज असून नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केल्यास अंजनगाव सुर्जीच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि या युवा अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून शहरातील नागरिकांचे प्रश्न निकाली काढणारी पहिली नगरपरिषद ठरेल, असे मत श्रीकांत नाथे यांनी व्यक्त केले असून सदर संदर्भात नगरपरिषद चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व प्रशासन यांना पत्र व्यवहार सुद्धा करणार असल्याचे म्हटले आहे.



