📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

उद्योजक हनुमंत जंजीरे यांच्या कन्येची यशस्वी भरारी; स्नेहलचे सीए परीक्षेत उज्ज्वल यश

उद्योजक हनुमंत जंजीरे यांच्या कन्येची यशस्वी भरारी; स्नेहलचे सीए परीक्षेत उज्ज्वल यश

आ. सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार, मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

आष्टी (प्रतिनिधी)

गोविंद उद्योग समूहाचे उद्योजक हनुमंत जंजीरे (दाजी) यांच्या कुटुंबासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला असून त्यांची कन्या कु. स्नेहल हनुमंत जंजीरे हिने मे २०२६ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आपल्या अद्वैतचंद्र निवासस्थानी स्नेहल हिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिद्द, कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाच्या बळावर स्नेहलने हे मानाचे यश प्राप्त केले आहे. आष्टी तालुक्यातील कुंभेफळ येथील स्वातंत्र्यसैनिक कै. भाऊसाहेब बाबुराव जंजीरे व रावसाहेब जंजीरे यांच्या प्रेरणादायी वारशातून लाभलेल्या संस्कारांच्या बळावर तिने यशाची ही उंच भरारी घेतली आहे.

स्नेहलने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल, औंध येथे पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा नॅशनल स्कूल अँड कॉलेज, पुणे येथे बारावी व पदवीचे शिक्षण घेत असतानाच सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने अथक परिश्रम सुरू ठेवले. अनेक आव्हाने, संघर्ष आणि कठीण टप्प्यांवर मात करत अखेर मे २०२६ मध्ये तिने चार्टर्ड अकाउंटंट ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त करून आपल्या कुटुंबासह संपूर्ण परिसराचा गौरव वाढविला. या यशामागे वडील उद्योजक हनुमंत जंजीरे, आई सौ. सुरेखा जंजीरे, भाऊ सुहास जंजीरे (सिव्हिल इंजिनिअर) तसेच कुटुंबीयांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि आशीर्वाद यांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार सुरेश धस यांच्या हस्ते स्नेहल हिचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना उपस्थित मान्यवरांनी तिच्या यशाचे कौतुक केले.

यावेळी जयदत्त धस, सागर धस, भाजप विधानसभा अध्यक्ष गणेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, माजी सभापती छत्रगुण मरकड, चेअरमन शांतीलाल भोसले, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष तानाजी जंजीरे, जयसिंग गव्हाणे, पोपट धुमाळ, विनोद रोडे, भरत जाधव, हरिभाऊ लगड, जालिंदर चव्हाण, गंगाधर काकडे, सुनील थोरवे, राजू मुंगसे, अशोक थोरवे, अमोल मिसाळ, करण काकडे, दादा काकडे, नवनाथ बिरंगल, संजय पवार, सुनील गायकवाड, सुदाम आगाशे, संजय पवार,ढेंगे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button