बीड

२१ मार्चला श्रीगोंद्यात भव्य पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

२१ मार्चला श्रीगोंद्यात भव्य पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

भव्य मिरवणूक, प्रवचन व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी :
जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी श्रीगोंदा शहरातील बगाडे लँडमार्क, महाराजा कॉलेज शेजारी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन रामानंद संप्रदाय, दक्षिण अहिल्यानगर भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता श्रींच्या सिद्ध पादुकांची श्रीगोंदा शहरातून भव्य मिरवणुकीने होणार असून, त्यानंतर पादुका कार्यक्रमस्थळी संतपीठावर विराजमान होतील. पुढे गुरुपूजन, आरती, प्रवचन, उपासक दीक्षा, बाल उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शैक्षणिक साहित्य वाटप, महाराष्ट्रभर ५३ रुग्णवाहिकांद्वारे मोफत सेवा, तसेच श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे २४ तास रुग्णालय सेवा दिली जाते. याशिवाय शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे व शेती अवजारे मोफत देणे, दुष्काळात जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे असे उपक्रमही राबविले जातात.
तसेच निराधार महिलांना शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्या, दुग्धजन्य जनावरे वाटप करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्यही संस्थानतर्फे केले जाते. अंधश्रद्धा दूर करून अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून जीवन जगण्याचे मार्गदर्शनही या माध्यमातून केले जाते.
कार्यक्रमानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, अधिकाधिक भाविकांनी पादुका दर्शन, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button