बीड

गेवराईचे खेळाडू राज्य पातळीवर जाणे हेच आमचे यश- रणवीर पंडित

गेवराईचे खेळाडू राज्य पातळीवर जाणे हेच आमचे यश- रणवीर पंडित

शारदा क्रीडा महोत्सवात रंगल्या मुलांच्या कब्बडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गेवराई दि. २८ (प्रतिनिधी) शारदा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून चार वर्षांपासून एक स्वप्न पाहिले होते ते आज साकार होताना दिसत असून गेवराईचे खेळाडूंची राज्य पातळीवर निवड होणे हेच आमच्या क्रीडा महोत्सवाचे यश आहे असे  प्रतिपादन शारदा स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष रणवीर अमरसिंह पंडित यांनी केले. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात तिसऱ्या दिवशी मुलांच्या १७ व १४ वयोगटातील कब्बडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात तिसऱ्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक १७ व १४ वयोगटातील मुलांच्या कब्बडी स्पर्धा घेण्यात आल्या. शारदा विद्यामंदिरच्या भव्य मैदानावर सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी मुलांच्या कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित,  पत्रकार संजय मालाणी, व्यंकटेश वैष्णव,  उद्योजक रविंद्र दहिवाळ यांच्यासह क्रीडा शिक्षक, विद्यार्थी खेळाडू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्काउट- गाईड पथक, भारतीयम पथक, सांस्कृतिक पथकाच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन आणि खेळाडूचा परिचय करून सामान्यांना प्रारंभ झाला.

लाल मातीवर आयुष्य आणि भविष्य घडविण्याची संधी रणवीर पंडित यांनी दिली—व्यकंटेश वैष्णव
===============
यावेळी बोलताना पत्रकार व्यंकटेश वैष्णव म्हणाले की, रणवीर पंडित यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्य राखून हा क्रिडा महोत्सव घेत असल्याने गेवराई तालुक्यात खुप मोठी क्रीडा चळवळ सुरू आहे, लाल मातीवर आयुष्य आणि भविष्य घडविण्याची चांगली संधी रणवीर पंडित यांनी उपलब्ध करून दिली. तुम्ही जेव्हा खेळतात त्यासाठी हजारो हात मेहनत घेत आहेत, याच मातीतून चांगले खेळाडू तयार होतील. विद्यार्थी मित्रांनो लढत रहा, खेळत रहा आणि आयुष्याच्या वळणावर जाऊन यशस्वी  व्हा असेही ते यावेळी म्हणाले.

मनातून भिती काढली तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो— संजय मालाणी
==============
यावेळी बोलताना पत्रकार संजय मालाणी म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचे एक व्हिजन घेऊन रणवीर पंडित काम करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो मनातून भिती काढली तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. यश मिळो अथवा न मिळो, खेळातून समाधान मिळते या भावनेतून खेळा, खेळतात आपण खिलाडू वृत्ती जपली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

शारदा विद्या मंदिरच्या भव्य मैदानावर मुलींच्या गटामध्ये कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. चार मैदानावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव काकडे यांनी केले. यावेळी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहप्रशासन अधिकारी प्रा. गोगुले, मुख्याध्यापक तथा प्राचार्य मुरलीधर पवार, अशोक तौर, भक्तराज पौळ, वसंत राठोड, रणजीत सानप, सय्यद युनुस, भागवत राऊत, विश्वनाथ पवार, अंकुश राठोड, लक्ष्मण काळे, शिवाजी पाटोळे, अरुण हाटकर, उदय पाठक, दत्तात्रय देशपांडे माजी मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, श्री. गरड यांच्यासह शिक्षण संस्थेतील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Back to top button