📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात 24 कोटींची नळपाणी योजना गेली पाण्यात? – निकृष्ट कामामुळे वारंवार पाईपलाईन फुटते; दोषींवर कारवाईची मागणी

मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात 24 कोटींची नळपाणी योजना गेली पाण्यात? – निकृष्ट कामामुळे वारंवार पाईपलाईन फुटते; दोषींवर कारवाईची मागणी
श्रीवर्धन (संदेश घोलप )श्रीवर्धन शहरातील नागरिकांना 24 तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने सुमारे 24 कोटी रुपयांची नळपाणी योजना मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आली होती. ही योजना राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात राबवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या.या योजनेच्या उद्घाटनावेळी “श्रीवर्धनकरांना 24 तास शुद्ध पाणी मिळेल आणि तेही तिसऱ्या मजल्यापर्यंत सहज पोहोचेल,” अशी मोठी घोषणा करण्यात आली होती. या घोषणेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.
मात्र प्रत्यक्षात ही योजना सुरू झाल्यापासून नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असून आतापर्यंत अंदाजे 60 ते 70 वेळा पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरवेळी पाईपलाईन फुटल्यानंतर दुरुस्तीसाठी सुमारे 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच लाखो रुपयांचा अतिरिक्त बोजा नगरपालिकेच्या तिजोरीवर पडत आहे.कहर म्हणजे, या कामाचा ठेकेदाराला संपूर्ण बिल अदा करून त्याचे डिपॉझिटदेखील घाईघाईत परत करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाईपलाईन फुटल्यानंतर होणारा सर्व खर्च हा नगरपालिकेच्या महसुलातून केला जात असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होत आहे. एका बाजूला नागरिकांना पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पैशातून निकृष्ट कामाची भरपाई केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर श्रीवर्धन नगरपालिका गट नेते व  सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र भुसणे यांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. भुसणे म्हणाले,
“श्रीवर्धनकरांच्या पैशातून उभारलेली 24 कोटींची योजना वारंवार फुटत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. एवढ्या मोठ्या निधीतून काम होऊनही जर पाईपलाईन 60-70 वेळा फुटत असेल, तर या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”ते पुढे म्हणाले,“ही योजना मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात राबवली जात असताना अशा प्रकारे निकृष्ट काम होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात जर ठेकेदार, अभियंते किंवा कन्सल्टन्सी जबाबदार असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. चुकीचे इस्टीमेट बनवणाऱ्या कन्सल्टन्सीला तात्काळ ब्लॅकलिस्ट केले पाहिजे. तसेच ज्यांनी या इस्टीमेटला तांत्रिक मान्यता (T.S.) दिली त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.”भुसणे यांनी पुढे आरोप केला की,“या प्रकरणात आम्ही आवाज उठवत आहोत. मात्र आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे म्हणजे नागरिकांवर अन्याय आहे.”
दरम्यान, या योजनेमुळे आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जुने काम निकृष्ट असल्यामुळे पुन्हा नवीन पाईपलाईन टाकण्याची वेळ येत आहे. यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे, पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत आणि पुन्हा रस्ते बनवावे लागणार आहेत. म्हणजेच नागरिकांच्या पैशांची दुहेरी नासाडी आणि नागरिकांना नाहक त्रास.
विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात सध्या पदावर असलेले नगरसेवक, नगराध्यक्ष आणि प्रशासन हेही अडचणीत सापडले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुसणे यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले आहे,
“हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नाही, तर श्रीवर्धनच्या प्रत्येक नागरिकाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी पक्षभेद विसरून या लढ्यात साथ द्यावी. जे कोणी दोषी असतील – ठेकेदार असो, अभियंता असो किंवा अधिकारी – त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. नागरिकांच्या पैशाची होणारी लूट आम्ही सहन करणार नाही.”
सध्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Back to top button