जामखेड नगरपरिषदेकडून दुर्लक्षित नागरी समस्या; बाबासाहेब चंदन यांचे संतप्त निवेदन

जामखेड नगरपरिषदेकडून दुर्लक्षित नागरी समस्या; बाबासाहेब चंदन यांचे संतप्त निवेदन
स्वच्छता, पाणी, अतिक्रमण, आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह
जामखेड प्रतिनिधी –जामखेड नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्यांचा वाढता गोंधळ, आणि प्रशासनाची उदासीनता पाहता, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बन्सी चंदन यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत नागरी प्रश्नांकडे लक्ष वेधले.
जामखेड शहराची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली असून, रस्त्यांवर पाणी साचणे, तुंबलेले नाले, मोकाट जनावरांची वर्दळ, अपुरी स्वच्छता व्यवस्था, उघडे प्लॉट्स, तसेच महिला-पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव या समस्या नागरिकांना त्रस्त करत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
चंदन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण शहरात स्वच्छतेची दयनीय अवस्था आहे. अनेक भागांत कचरा वेळेवर उचलला जात नाही, नाल्यांची साफसफाई होत नाही, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे, तर मोकाट जनावरे व अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वापराचे पाणी रस्त्यावर साचून राहते आहे. तसेच, रिकाम्या प्लॉट्समध्ये बाभळी व तण वाढले असून, या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी विविध रोगराईला आमंत्रण मिळत आहे.शहरात सार्वजनिक शौचालयांची कमतरता असून, महिलांना व पुरुषांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, नगरपरिषदेचा दवाखाना देखील अद्याप सुरू न झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य सुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
रस्त्यांवर दुकानांचा माल, बांधकाम साहित्य, गॅलऱ्या रस्त्यावर आलेल्या असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा आणि अंत्ययात्रा यांना अडथळे निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.शहरातील उपनगर, वाड्या आणि नगरपरिषद हद्दीतील गावांमध्येही स्वच्छतेचे काम सुरू नसल्याची तक्रार त्यांनी मांडली.
या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बाबासाहेब चंदन यांनी दिला आहे.



