बीड

आदित्य इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची चार्जिंग स्टेशनला भेट

आदित्य इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची चार्जिंग स्टेशनला भेट

पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड, विद्यार्थ्यांनी अनुभवली भविष्यातील ‘इलेक्ट्रिक क्रांती’,  ई-बसचे तंत्रज्ञान; बॅटरी चार्जिंग आणि एसी सिस्टीमचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
प्रतिनिधी | बीड
शहरातील आदित्य एज्युकेशन ग्रुप संचलित आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. इमामपूर रोडवरील ई-व्हीकल चार्जिंग स्टेशनला भेट देऊन विद्यार्थ्यांनी बॅटरी चार्जिंग तंत्रज्ञान आणि ई-बसच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीमुळे विद्यार्थांच्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. विद्यार्थ्यांनी भविष्यातील ‘इलेक्ट्रिक क्रांती चा  अनुभव घेतला.    ई-बसचे तंत्रज्ञान,बॅटरी चार्जिंग आणि एसी सिस्टीमची प्रत्यक्ष माहिती घेतली.
ही औद्योगिक भेट आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा आणि संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाली.  द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या भेटीत सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी चार्जिंग स्टेशनचे डेपो मॅनेजर बाळू जगताप यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांची कार्यप्रणाली, चार्जिंग प्रक्रिया आणि बॅटरी सिस्टीमची सविस्तर माहिती दिली. विशेषतः ई-बसमध्ये वापरले जाणारे एसी कूलिंग तंत्रज्ञान आणि ऊर्जा बचतीची पद्धत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणांद्वारे समजावून सांगण्यात आली. ही भेट यशस्वी करण्यासाठी आदित्य शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. निलेश बहादुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एल. बी. राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रा. जाधव विलास आणि प्रा. यु. एस. मिर्झा यांनी या दौऱ्याचे नियोजन केले. यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहने हे प्रभावी माध्यम ठरत आहेत. आगामी काळात ऑटोमोबाईल क्षेत्रात ‘इलेक्ट्रिक क्रांती’ होणार असून, या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरच मिळावे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

करिअरच्या संधींवर मार्गदर्शन
भविष्यात ई-वाहनांचे महत्त्व आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. एसी आणि डीसी चार्जिंगमधील फरक, बॅटरीचे प्रकार आणि त्यांची देखभाल कशी करावी, याचे तांत्रिक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले. या उपक्रमामुळे पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाशी सुसंगत राहावे
आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहने ही भविष्याची गरज असून, या क्षेत्रातील तांत्रिक बारकावे आणि रोजगाराच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने अशा औद्योगिक भेटींचे आयोजन करण्यात येते. आदित्य शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध आहे.
–डॉ. आदित्य सारडा, संचालक, आदित्य शिक्षण संस्था, बीड*

Back to top button