बीड

आदर्श शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक आणि हरहुन्नरी कलावंत जी. एल. देशमुख यांचे निधन

आदर्श शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक आणि हरहुन्नरी कलावंत जी. एल. देशमुख यांचे निधन

जामखेड : पंचक्रोशीत जी.एल.देशमुख या नावाने सुपरिचित असलेले गजानन लक्ष्मणराव देशमुख यांचे गुरुवारी (दि. २ जानेवारी २०२६) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जामखेड तालुक्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
फेब्रुवारी १९४४ मध्ये जन्मलेले देशमुख यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा मोठा काळ शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतला. ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर हळगाव, साकत येथील विद्यालयात मुख्याध्यापक तसेच ल. ना. होशिंग विद्यालयात प्राचार्य पद भूषवून त्यांनी उत्कृष्ट प्रशासक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
विद्यार्थीप्रिय गणित विषयाचे अध्यापक म्हणून ते विशेष परिचित होते. शिस्त, गुणवत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख समन्वय त्यांच्या अध्यापनात दिसून येत असे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शिक्षणाबरोबरच कला क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. नटराज नाट्य मंडळ, जामखेड यांच्या माध्यमातून त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या प्रभावी नाट्य अभिनयाने प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकली. राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना सन्मान मिळाला होता. त्यामुळे ते उत्कृष्ट नाट्यकर्मी म्हणूनही ओळखले जात होते.प्रशासनिक क्षमतेचा ठसा उमटवत त्यांनी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवाचे अत्योत्कृष्ट आयोजन केले. तसेच जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या उत्कृष्ट नियोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
वाचन संस्कृतीचे संवर्धन करणारे कार्यही त्यांनी केले. १३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोकमान्य तालुका वाचनालयाचे ते प्रदीर्घ काळ सचिव होते. वाचन चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत अनेक पिढ्यांना वाचनाची गोडी लावली.आदर्श शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक आणि हरहुन्नरी कलावंत असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले जी.एल.देशमुख यांच्या निधनाने जामखेडने एक ज्येष्ठ, अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आठवण दीर्घकाळ प्रेरणा देत राहील.

Back to top button