“अफवांना पूर्णविराम :बुलढाणा अर्बन बँकेची तिजोरी मजबूत”

“अफवांना पूर्णविराम :बुलढाणा अर्बन बँकेची तिजोरी मजबूत”
“४ हजार कोटींची शिल्लक :
ठेवीदारांचे पैसे पूर्णतः सुरक्षित”
सुहास सावंत / माजलगाव
बुलढाणा अर्बन बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत सक्षम व भक्कम असून मल्टिस्टेट स्तरावर बँकेकडे सुमारे ४ हजार कोटी रुपयांची शिल्लक उपलब्ध असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली.ठेवीदारांनी मागणी केल्यास कोणत्याही अडचणीशिवाय तात्काळ रक्कम देण्याची बँकेची पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मराठवाड्यातील एका शाखेसंदर्भात पसरवण्यात आलेल्या अफवांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ठेवीदारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.बुलढाणा अर्बन बँकेच्या सर्व ठेवी पूर्णतः सुरक्षित असून बँकेची आर्थिक घडी अत्यंत मजबूत असल्याचा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.बँकेच्या व्यवहारांमध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवली जात असून नियामक संस्थांच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कर्जवाटप, वसुली तसेच दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ठेवीदारांचा विश्वास अबाधित राखणे हेच बँकेचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी प्रशासन सतत दक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काही ठिकाणी जाणीवपूर्वक अफवा पसरवून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.मात्र अशा अफवांमुळे बँकेच्या प्रत्यक्ष आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.बँकेकडे पुरेशी तरलता, मजबूत भांडवल आणि सक्षम व्यवस्थापन असल्यामुळे ठेवीदारांच्या रकमेला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठेवीदारांनी केवळ बँकेकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.बुलढाणा अर्बन बँक ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यास पूर्णतः सक्षम असून भविष्यातही विश्वासार्ह सेवा देत राहील, असा विश्वास अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला.
चौकट
विभागीय अधिकारी बीड माधव मगर
महाराष्ट्रातील सर्व शाखा सुट्टीच्या दिवशी रविवारी देखील चालू ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाचा विश्वास विश्वास बँकेने संपादन केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी अफेवर विश्वास अजिबात ठेवू नये.



