“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला भव्य मंच” अंजनगाव सुर्जी येथे शालेय स्पर्धांचा उत्साहात शुभारंभ

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : स्व. दिगंबरराव पेटकर प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, अंजनगाव सुर्जी येथे शालेय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, शैक्षणिक साहित्य व चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था, शिंदी बु. यांच्या वतीने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय होटे (प्रदेश उपाध्यक्ष, शिवराज्य स्वच्छता कामगार सेना, म.रा.) होते, तर उद्घाटक म्हणून सुधाकर टिपरे (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, अमरावती) यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
प्रमुख अतिथी म्हणून अमोल रसे (अध्यक्ष, जेसिआय अंजनगाव सुर्जी), सुनील माकोडे (पत्रकार, नवप्रहार), मनोज मेळे (पत्रकार, बहुजन इंडिया न्यूज), महेंद्र भगत (पत्रकार, दैनिक महाराष्ट्र सूर्योदय), पंकज हिरूळकर (पत्रकार, दैनिक महाराष्ट्र सूर्योदय – जिल्हा प्रतिनिधी), सचिन इंगळे (पत्रकार, साप्ताहिक खरा संवाद), चंद्रशेखर देशमुख (शहराध्यक्ष, ओबीसी बहुजन आघाडी, अंजनगाव सुर्जी), सुरज पवार (शहर उपाध्यक्ष, ओबीसी बहुजन आघाडी), प्रवीण पेटकर (अध्यक्ष, सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था), प्रदीप हाडोळे (उपाध्यक्ष), देवेंद्र पेटकर (सचिव), रामविलास गावंडे (कोषाध्यक्ष) तसेच कैलास दमाहे (सदस्य प्रमुख) यांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्था विश्वस्त व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सर्व आयोजित स्पर्धांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत विज्ञाननिष्ठ विचार, कलात्मकता व क्रीडाभावनेचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी पेटकर यांनी संस्था व शाळेबाबत सविस्तर माहिती देत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी केले. संचालन विशाल जाधव यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन अधीक्षक अमोल सुधाकर हाडोळे यांनी मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे मानले.
संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने व विविध प्रदर्शनांनी उजळून निघाला होता. शाळेतील शिस्तबद्ध व नियोजनबद्ध व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण पाहून काही क्षण मान्यवरही भारावून गेले. या उपक्रमामुळे अंजनगाव परिसरात शैक्षणिक व सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या गुणविकासाला योग्य दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



