बीड
लिंबागणेश येथील अखंड हरिनाम सप्ताहाची शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता

लिंबागणेश येथील अखंड हरिनाम सप्ताहाची
शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता
—-
लिंबागणेश :- (दि.२९) बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावनभूमीत भरविण्यात आलेल्या अखंड हरिनाम व गणेश नाम सप्ताह सोहळ्याची सांगता काल दि.२८ गुरुवारी झाली. सांगतेचा सोहळा महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती, मठाधिपती श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.
“तुझिये संगती जाली आमुची निश्चिंती; नाही देखिले ते मिळे! भोग सुखाचे सोहळे!” या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओव्यांनी आणि दाखल्यांनी मन हेलावणारे सुश्राव्य कीर्तन रंगले. संतसाहित्याचा आधार घेत भगवंताच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित करत भक्तांना अध्यात्मिक उन्नतीचा संदेश दिला.
दि.२१ ते २८ या सप्ताहकाळात भालचंद्र मंदिर सभामंडपात ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे (बीड), ह.भ.प. एकनाथ महाराज गाडे (चकलांबा), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोटुळे (आळंदी देवाची), ह.भ.प. बबन महाराज मंझरीकर, ह.भ.प. गुरूवर्य सिमामाई धर्मराज महाराज पाटील (सामनगावकर), ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (बंकट स्वामी संस्थान, नेकनुर), वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंधवे (बापू, विठ्ठलगड पाटोदा) आदी नामवंत कीर्तनकारांनी विविध विषयांवर समाजप्रबोधन केले.
सप्ताहभर हरिजागर, दुपारची प्रवचनसेवा आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सांगतेनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. महादेव भारती महाराज (बेलेश्वर संस्थान), गुरुवर्य धर्मराज दादा (सामनगाव), राजू लोखंडे (पाटोदा), खुळे महाराज (वैजाळा), शहादेव महाराज येडे (मोरगाव), विष्णू महाराज घरत (महाजनवाडी), गायक किशोर महाराज येडे,अशोक येडे (मृदंगाचार्य) यांनी उपस्थित राहून किर्तनात रंग भरला.
सोहळ्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.



