बीड
बीड येथे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची उभारणी करा- डॉ. साळुंके

बीड येथे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची उभारणी करा- डॉ. साळुंके
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याला इतिहासाचा प्रचंड मोठा वारसा आहे. प्राचीन ते अर्वाचीन कालखंडात बीड जिल्ह्यात अनेक घटना घडल्या. शालिवाहन राजवटी पासून ते थेट हैदराबाद संस्थानच्या निजामापर्यंत जवळपास दीड हजार वर्षात बीड जिल्ह्यात विविध स्मारके उभा राहिली. जिल्हाभरात अनेक शिल्प, शिलालेख, स्थानपोथ्या, वीरगळी, नाणी, शस्त्रे बेवारस पडली असून यांचे एकत्रित संग्रहालय उभे राहिल्यास बीड जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास हा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहील. यासाठी बीड शहरात ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभे करावे अशी मागणी इतिहासकार व बीड जिल्हा इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केली
साळुंके म्हणाले की बीड जिल्ह्याला न. शं. पोहनेरकर व स.मा. गर्गे यांच्यासारख्या महान इतिहासकारांची पार्श्वभूमी आहे. बीड जिल्ह्यात बीड शहरासह धर्मापुरी, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, गेवराई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व केज आदी भागात मोठ्या प्रमाणात मंदिरे व दर्गा असून त्यापैकी बहुसंख्य मंदिरावरील शिल्पे व अवशेष सध्या दुर्लक्षित आहेत. त्यांना एकत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बीड जिल्ह्यात पंधराव्या शतकापासूनच्या स्थानपोथ्या असून अलीकडच्या काळातच सहाव्या शतकात भूर्जपत्रावर लिहिलेल्या आयुर्वेदाच्या ग्रंथाची पाने सापडली आहेत. याशिवाय अनेकांच्या घरी मध्ययुगीन तलवारी ढाली तसेच विविध अवशेष उपलब्ध असून हे सगळे एकत्रित होणे आवश्यक आहे. यासाठी इतिहास परिषदेच्या वतीने व्यापक लढा पुकारला जाणारा असून इतिहास प्रेमी नागरिकांनी त्यात सामील व्हावे.या संदर्भात लवकरच सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाद्वारेभेट घेणार असल्यासही साळुंके यांनी सांगितलं.



