अमरावतीच्या नवोदयची दोन विद्यार्थ्यांकडून देशभरात झळकली प्रतिभा राष्ट्रीय एकता समागम-2025 मध्ये व्हायोलिन व 2-डी आर्टमध्ये देशात प्रथम

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती : पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, अमरावतीच्या दोन होनहार विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे संपन्न झालेल्या 24 व्या राष्ट्रीय एकता समागम-2025 मध्ये बहारदार कामगिरी करत अमरावतीचे नाव देशभरात दिमाखात झळकावले.
या स्पर्धेमध्ये मास्टर वेदांत अथीलकर यांनी व्हायोलिन वादनात देशात प्रथम क्रमांक, तर मास्टर हर्षल सोनोने यांनी 2-डी आर्टमध्ये देशात अव्वल येत दुहेरी मानाचा मुकुट विद्यालयाच्या नावावर ठेवला. याशिवाय, समूह वादन (ऑर्केस्ट्रा) प्रकारात दर्शन निकोडे, जीत खवले, अर्णव बोडखे आणि आरुष पाझरे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत उपविजेतेपद पटकावले.
कार्यक्रमादरम्यान नवोदय विद्यालय समिती, दिल्लीचे आयुक्त राजेश लखानी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांचा उत्साह वाढवला. देशभरातील 661 नवोदय विद्यालयांमधून विभागीय, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरांवर आयोजित विविध कला, संस्कृती व संगीत स्पर्धांमध्ये अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी सलग सर्व टप्पे पार करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
पुणे संभागातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा-नगर हवेली व दमण या पाच राज्यांपैकी एकूण सहा प्रथम क्रमांकांपैकी अमरावती नवोदयनेच दोन प्रथम क्रमांक पटकावणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे विभागाच्या उपायुक्त श्रीमती मेरी मनी व सहउपायुक्त प्रेमकुमार यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, उपप्राचार्य एस. हिसवणकर यांच्या मार्गदर्शनासोबत संगीत शिक्षक विनोद अथीलकर, कला शिक्षक एस. एन. मालवीय व संपूर्ण शिक्षकवर्गाच्या सहकार्याने हे यश शक्य झाल्याचे पालक व विद्यार्थ्यांनी सांगितले.
