बीड

श्रीवर्धन तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; वेळास येथे घराचे पत्रे उडाले, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

श्रीवर्धन तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; वेळास येथे घराचे पत्रे उडाले, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

​श्रीवर्धन (संदेश घोलप):
श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण रायगड किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, आता या पावसाला वादळी वाऱ्याची जोड मिळाली आहे. या बदललेल्या हवामानाचा मोठा फटका आज, रविवारी पहाटे श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील दळवीवाडीला बसला. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीव्र वादळी वाऱ्याच्या झोक्यामुळे येथील स्थानिक रहिवासी श्री. साहिल सुनील दळवी यांच्या राहत्या घरावरील छपराचे सिमेंटचे पत्रे हवेत उडून गेले. या घटनेत घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप बचावले आहेत.
​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वेळास (दळवीवाडी) परिसरात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास अचानक हवेचा दाब वाढला आणि सोसाट्याचा वादळी वारा सुटला. अचानक आलेल्या तीव्र हवेच्या झोक्याने आणि वादळाच्या प्रचंड आवाजाने घराचे छप्पर आणि पत्रे एकाएकी उडून काही अंतरावर जाऊन पडले. पत्रे उडाल्यामुळे ऐन पावसाळ्यात घर उघडे पडले आणि घरातील संसारोपयोगी साहित्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दळवी कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक काही काळ प्रचंड भीतीखाली होते.
​ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी परिसरात अंधार होता आणि पाऊसही सुरू होता. हवेच्या तीव्र वेगामुळे पत्रे उडून गेले तरी, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पत्र्यांच्या धारदार कडांमुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असल्याने ग्रामस्थांनी आणि नातेवाइकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
​निसर्गाच्या या अवकृपेमुळे साहिल दळवी यांच्या घराचे छप्पर उद्ध्वस्त झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोक्यावरचे छप्पर हिरावले गेल्याने हे कुटुंब आता संकटात सापडले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने दळवी यांच्या घराकडे धाव घेत त्यांना धीर दिला व घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली. स्थानिक महसूल प्रशासन आणि तलाठ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करावा आणि दळवी कुटुंबाला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी वेळास येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Back to top button