संपादकीय

आरक्षण! जामखेड पंचायत समिती सभापतीपद ओबीसी महिलांसाठी राखीव

जामखेड प्रतिनिधी – जामखेड पंचायत समितीची निवडणूक तीन वर्षे प्रशासकीय राजवटी नंतर होत आहे. सभापती पद हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे इथे चांगलीच राजकीय चुरस पहायला मिळणार आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे खर्डा व जवळा असे दोन गट व पंचायत समितीचे हळगाव, साकत, खर्डा व जवळा असे चार गण होते. येथील सर्व विजयी उमेदवार भाजपचे होते. यावेळी एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २०१७साली झाल्या होत्या. २०२२ ला मुदत संपल्यानंतर तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. त्यावेळी खर्डा व जवळा असे जिल्हा परिषद गट होते व दोन्ही गट अनुसूचित जातीसाठी राखीव होते व पंचायत समितीचे चार गण होते. यामध्ये जवळा गण-अनुसूचित जातीसाठी होते. भाजपमधून सुभाष आव्हाड विजयी झाले होते. हळगाव गण भाजपच्या राजश्री मोरे, साकत गण भाजपचे डॉ. भगवान मुरूमकर व खर्डा गणातून भाजपच्या मनिषा सुरवसे विजयी झाल्या होत्या. पंचायत समितीचे सभापतीपद पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव होते.जवळा गण एकमेव राखीव होता. त्यामुळे जवळा गणातून जो कोणी निवडून येईल तो सभापती होणार हे निश्चित होते व झालेही तसेच. एकमेव भाजपचे उमेदवार सुभाष आव्हाड निवडून आले व ते सभापती झाले होते. तर उपसभापतीपदी राजश्री मोरे झाल्या होत्या.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड व उपसभापती राजश्री मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतरच्या अडीच वर्षासाठी सभापतीपद नागरिकांचा मागासप्रवर्ग निघाला. त्यावेळी राजकीय घडामोडी घडल्या. केवळ उपसभापतीपदी मनिषा सुरवसे या बिनविरोध निवडून आल्या. मात्र नऊ महिन्यांपासून सभापती पद रिक्त होते. प्रभारी सभापती पदाचा कारभार उपसभापती मनिषा सुरवसे यांच्याकडे होता. नऊ महिन्यानंतर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाले व या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे सभापती म्हणून विराजमान झाल्या. जामखेड तालुक्यात तिसरा साकत जिल्हा परिषद गट उदयास आला. दिघोळ व साकत असे दोन नवीन गण अस्तित्वात आले. खर्डा जिल्हा परिषद गटात खर्डा व नान्नज गण तर जवळा जिल्हा परिषद गटात जवळा व अरणगाव असे गण पडले. एक गट व दोन गण वाढल्याने कार्यकर्त्यात उत्साह वाढला आहे.

Back to top button