📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आदियोगीचा भव्य शो पाहण्यासाठी बीडकरांची तुफान गर्दी!

आदियोगीचा भव्य शो पाहण्यासाठी बीडकरांची तुफान गर्दी!

विठ्ठल मंदिर चौकात लोटला जनसागर; डमरूच्या गजरात आणि लेझरच्या झगमगाटात बीड झाले शिवमय

बीड : बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाच्या वतीने विठ्ठल मंदिर चौक येथे साकारण्यात आलेल्या २८ फूट उंच आदियोगीच्या भव्य प्रतिमेवरील अत्याधुनिक प्रोजेक्शन मॅपिंग आणि लेझर शोला बीडकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शोच्या वेळेत विठ्ठल मंदिर चौक आणि परिसरात नागरिकांची अक्षरशः गर्दी उसळत असून, आदियोगीचा भव्य सोहळा पाहण्यासाठी शहराच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

शो सुरू होण्यापूर्वीच परिसरात नागरिकांची लगबग सुरू होत असून, कुटुंबांसह येणारे नागरिक, युवक-युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी विठ्ठल मंदिर चौक गजबजून जात आहे. शो सुरू होताच डमरूचा निनाद आणि शंखनादाने वातावरण भारून जाते. त्यानंतर लेझर किरणांचा झगमगाट आणि आदियोगीच्या प्रतिमेवर साकार होणाऱ्या प्रोजेक्शन मॅपिंगच्या दृश्यांमुळे उपस्थितांचे लक्ष काही क्षणांसाठी खिळून राहते.

एकीकडे शो पाहण्यासाठी जमलेला नागरिकांचा जनसागर आणि दुसरीकडे प्रकाश-ध्वनीच्या माध्यमातून साकारले जाणारे आदियोगीचे विराट रूप, यामुळे विठ्ठल मंदिर चौकाला जणू शिवमय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शोच्या उत्कर्षबिंदूवर आदियोगीचे विराट स्वरूप प्रकाशझोतात येताच परिसरात ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने अक्षरशः दुमदुमून जात आहे.

बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाने यापूर्वी तिरुपती बालाजी, केदारनाथ, वैष्णोदेवी, सोमनाथ आणि रामेश्वरम यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या संकल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बीडकरांसमोर साकारल्या आहेत. यंदा आदियोगीच्या माध्यमातून बीडमध्येच शिवतत्त्वाचा भव्य आणि दिव्य अनुभव देण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.

प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर, प्रकाशयोजना आणि प्रभावी ध्वनी यांचा सुरेख मेळ साधण्यात आला असून, या अनोख्या प्रयोगामुळे यंदाचा गणेशोत्सव नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

“दरवर्षी बीडकरांना काहीतरी नवीन, भव्य आणि अविस्मरणीय अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी विविध तीर्थक्षेत्रांच्या संकल्पना साकारल्यानंतर यंदा आदियोगीच्या माध्यमातून शिवतत्त्वाचा भव्य अनुभव बीडकरांसमोर आणला आहे,” अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक सीए गिरीश गिल्डा यांनी दिली.

आदियोगीचा हा भव्य शो पाहण्यासाठी बीडकरांनी मोठ्या संख्येने विठ्ठल मंदिर चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button