📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तलवाड्यात ‘त्वरिता क्रिकेट अकॅडमी’चा शुभारंभ ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळणार प्रशिक्षणाचे व्यासपीठ :- ॲड सुरेश हात्ते 

तलवाड्यात ‘त्वरिता क्रिकेट अकॅडमी’चा शुभारंभ
  • ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळणार प्रशिक्षणाचे व्यासपीठ :- ॲड सुरेश हात्ते
तलवाडा सूर्योदय न्यूज
 तलवाडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अॅड. सुरेशराव हात्ते यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी त्वरिता क्रिकेट अकॅडमीची सुरुवात करण्यात आली. त्वरितापुरी कला व विज्ञान महाविद्यालय आणि त्वरिता स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ आज अॅड. सुरेशराव हात्ते यांच्या हस्ते करण्यात आला.
तलवाडा आणि परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेल्या क्रीडागुणांना योग्य दिशा मिळावी, त्यांना शिस्तबद्ध व दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या कौशल्याला व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू असून योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध झाल्यास ते राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. तलवाड्यासारख्या ग्रामीण भागातून भविष्यात राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडावेत, हा अॅड. सुरेशराव हात्ते यांच्या संकल्पनेमागील प्रमुख उद्देश आहे.
या अकॅडमीच्या माध्यमातून युवा खेळाडूंना क्रिकेटमधील तांत्रिक कौशल्यांसोबतच शिस्त, संघभावना, सातत्य आणि क्रीडावृत्तीचे संस्कार मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात आपले भविष्य घडविण्यासाठी हे व्यासपीठ निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
शुभारंभप्रसंगी क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक अभिषेक करडे, त्वरिता स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शक इंजी. अजय हात्ते, पत्रकार आर. आर. आबा, संतोष हातागळे, विजय हातागळे, ऋषिकेश करडे, नाना गर्जे तसेच तलवाडा परिसरातील अनेक खेळाडू उपस्थित होते.ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देत “ग्रामीण मातीतून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणे” या ध्येयाने सुरू झालेली त्वरिता क्रिकेट अकॅडमी आगामी काळात अनेक युवा क्रिकेटपटूंना नवी संधी आणि दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Back to top button