आ. रोहित पवारांच्या संघर्षामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला; उर्वरित जाचक अटीही रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी – जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के

आ. रोहित पवारांच्या संघर्षामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला; उर्वरित जाचक अटीही रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी – जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के
बीड | प्रतिनिधी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील काही जाचक अटी हटविण्याचा निर्णय हा आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे. मात्र, योजनेतील उर्वरित जाचक अटीही तात्काळ रद्द करून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली.
राजेंद्र मस्के म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेत अनेक जाचक अटी घालण्यात आल्याने लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार होते. २०१९ च्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफीची मर्यादा घालण्यात आली होती. तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठीही विविध अटी लावण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत होता.
या अन्यायकारक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने आवाज उठवला. पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन तसेच छत्रपती संभाजीनगर येथे एल्गार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि राज्यभरातील शेतकरी संघर्षामुळे शासनाला ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा लागला. तसेच, प्रोत्साहनपर अनुदानासाठी घालण्यात आलेल्या काही जाचक अटीही मागे घेण्यात आल्या.
मात्र, अद्यापही योजनेत काही अटी कायम असून त्यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उर्वरित सर्व जाचक अटी तातडीने रद्द करून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली.
“हा संघर्ष शेतकरी एकजुटीचा आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. जनहिताच्या प्रश्नांवर सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारा हा लढा पुढेही सुरू राहील. पीकविमा, वीजपुरवठा, नुकसानभरपाई तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांसाठीही आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू,” असेही जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्पष्ट केले.
चौकट
कर्जमुक्ती योजनेतील अनेक जाचक अटी हटल्या, मात्र उर्वरित अटीही रद्द करण्याची मागणी
सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची भूमिका



