गेवराई बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांचा उच्चांकी भाव; शेतकऱ्यांत आनंद, अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांचे मानले आभार
गेवराई, दि. ७ (प्रतिनिधी) : गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला प्रतिक्विंटल तब्बल ३,२०० रुपये असा उच्चांकी भाव मिळाल्याने परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसरात आनंद व्यक्त करत एकमेकांचे अभिनंदन केले.
कांद्याला मिळालेल्या या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, उत्पादन खर्च भरून निघण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. चांगल्या बाजारभावामुळे भविष्यातही शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे अधिक कल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बाजारपेठेत अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार अमरसिंह पंडित तसेच आमदार विजयसिंह पंडित यांचे आभार मानले. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे शेतकऱ्यांनी कौतुक केले.
बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, दर्जेदार कांद्याला चांगली मागणी असल्याने आगामी काळातही बाजारभाव समाधानकारक राहतील, अशी अपेक्षा व्यापारी व शेतकरी व्यक्त करत आहेत.