जामखेड महाविद्यालयात आकाशवाणी निवेदक आनंद देशमुख यांचा सपत्नीक सत्कार

जामखेड महाविद्यालयात आकाशवाणी निवेदक आनंद देशमुख यांचा सपत्नीक सत्कार
जामखेड प्रतिनिधी — दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय येथे आज (दि. १७ फेब्रुवारी २०२६) प्रसिद्ध आकाशवाणी निवेदक आनंद देशमुख व त्यांच्या सौभाग्यवती सौ. कुंदाताई देशमुख यांचा महाविद्यालयाच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्याचा गौरव करण्याचा हा सोहळा महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सुनिल पुराणे यांनी करून दिला. जामखेडसारख्या दुष्काळी व दुर्गम भागातून घडलेले आनंद देशमुख यांना ब्रिटिश पार्लमेंटकडून “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स” (लंडन) सन्मान प्राप्त झाला आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सलग ३३ वर्षे निवेदन केल्याबद्दल त्यांना विशेष गौरव मिळाला असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचाही “जिंदादिल” पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना प्राचार्य डॉ. सुनिल पुराणे यांनी व्यक्त केली.
देशमुख यांनी आकाशवाणीमध्ये २४ वर्षे निवेदक तथा कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले असून गेली ५७ वर्षे ते निवेदन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनात सौ. कुंदाताई देशमुख यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. यावेळी कुंदाताई यांनी देशमुख यांच्या जीवनप्रवासावर आधारित आत्मचरित्र लिहिण्याचा संकल्प व्यक्त केला.
संवादाच्या वेळी देशमुख यांनी कला, साहित्य व संगीत क्षेत्राविषयी ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त करत ग्रामीण भागाशी असलेली आपली नाळ आजही घट्ट असल्याचे सांगितले. संस्थेच्या भविष्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
याप्रसंगी दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दिलीप गुगळे, माजी सचिव शशिकांत देशमुख, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. एस. एन. गाडेकर, कला शाखाप्रमुख प्रा. ए. बी. फलके तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. पुराणे यांनी केले, तर आभार प्रा. फलके यांनी मानले



