बीड

मतदारांनी SIR विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत सहभागी व्हावे – राजेंद्र मस्के

मतदारांनी SIR विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत सहभागी व्हावे – राजेंद्र मस्के

 

बीड | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभर विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळून घेत आहेत. या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

 

या मोहिमेदरम्यान BLO प्रत्येक कुटुंबाला दोन फॉर्म देत आहेत. नागरिकांनी हे दोन्ही फॉर्म काळजीपूर्वक व अचूक भरावेत. त्यापैकी एक भरलेला फॉर्म BLO कडे जमा करावा, तर दुसरी प्रत स्वतःकडे सुरक्षित जपून ठेवावी. भविष्यात मतदार यादीच्या पडताळणीसाठी किंवा इतर आवश्यक कामांसाठी ही प्रत उपयुक्त ठरू शकते.

 

फॉर्म भरताना नाव, जन्मतारीख, पत्ता, मतदार क्रमांक व इतर सर्व माहिती अचूक नमूद करावी. आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात. चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे टाळावे.

 

मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव अचूक राहणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रक्रियेला सहकार्य करावे. BLO आपल्या घरी आल्यास त्यांना आवश्यक माहिती द्यावी आणि आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची पडताळणी पूर्ण झाल्याची खात्री करून घ्यावी, असेही राजेंद्र मस्के यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

“मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला अमूल्य अधिकार आहे. कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मिळालेले दोन्ही फॉर्म अचूक भरून त्यापैकी एक प्रत BLO कडे जमा करावी आणि दुसरी प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने या विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत जबाबदारीने सहभागी व्हावे,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.

 

Back to top button