संपादकीय

“२०२४ सालापर्यंत दररोज ४० किलोमीटर या गतीने देशात जागतिक दर्जाचे ६० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधायचे”

२०२४ सालापर्यंत दररोज ४० किलोमीटर या गतीने देशात जागतिक दर्जाचे ६० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधायचे आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अलीकडेच अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गडकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात एक एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च होतो. हा दर कमी केल्याशिवाय महाराष्ट्रात रस्तेविकास गतीने होऊ शकणार नाही. मात्र एवढे असले, तरी महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी २ हजार ७८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गडकरी हे जोरदार काम करण्याबद्दल प्रसिद्ध असून, कोणत्याही देशाच्या विकासात रस्ते हे महत्त्वाची कामगिरी बजावत असतात.

चीनचा विकास रस्त्यांमुळेच झाला.२००० साली चीनने ५० हजार किमीचे रस्ते बांधले, तर २०२० अखेर ६० हजार किमीचे रस्ते तेथे बांधण्यात आले. याचा अर्थ, केवळ दोन दशकांमध्ये अवघ्या अमेरिकेत जेवढे आंतरराज्यीय महामार्ग आहेत, त्यापेक्षा वीस टक्‍के अधिक लांबीचे रस्ते चीनने बांधले. चीनमधील एकूण रस्त्यांच्या तुलनेत, गेल्या दोन दशकांत जे रस्ते बांधले, त्यांचे प्रमाण ४० टक्‍के इतके आहे.

मागच्या दोन दशकांत भारतातील महामार्गांच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाली. परंतु ते चीनच्या तुलनेत अरूंद असून, त्यांचा दर्जा कमी आहे. रस्त्यांची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. उदाहरणार्थ, मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील खड्डे हे जगविख्यातच आहेत! शिवाय देशातील एकूण रस्ताव्यवस्थेत आपल्याकडील महामार्गांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंद असून, महानगरे व मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीचे अक्षरशः अराजक निर्माण झाले आहे.

विमानतळ व बंदरांपासून ते कारखान्यांपर्यंत मालाची वेगाने वाहतूक होऊ शकत नाही. हे असे असल्यामुळेच मालवाहतूकदार, व्यापारी व उद्योजक रस्त्यांबद्दलची नाराजी वारंवार सरकारला निवेदने पाठवून व्यक्‍त करत असतात. गेल्या वीस वर्षांत चीनचे सकल राष्ट्रीय उत्पादन (सराउ) बारापटीने वाढून, १५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले. तर भारताचे सराउ अवघ्या सहापटीने वाढून, २.६ ट्रिलियन डॉलर्सवर गेले.

 

Back to top button