बीड

लेझीमच्या तालावर दुर्गामातेचे भव्य स्वागतः सारडा रेसिडेन्सी उत्साहात दुमदुमली

लेझीमच्या तालावर दुर्गामातेचे भव्य स्वागतः सारडा रेसिडेन्सी उत्साहात दुमदुमली
 
नवरात्र महोत्सवाची रंगतः महिलांच्या लेझीम-गरब्याने गाजले दुर्गादेवीचे आगमन
 

सारडा रेसिडेन्सीमध्ये दुर्गामातेचे लेझीमच्या गाजावाजात स्वागत

बीड प्रतिनिधी : शहरातील सारडा रेसिडेन्सी परिसरात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दुर्गादेवीचे भव्य स्वागत करण्यात आले. लेझीमच्या तालावर महिलांनी सादर केलेल्या कलात्मक सादरीकरणामुळे परिसर दुमदुमून गेला. मागील आठ दिवसांपासून महिलांनी लेझीम आणि गरब्याच्या सरावाची जय्यत तयारी केली होती. देवीचे आगमन होताच भक्तीभाव, आनंद आणि उत्साह यांचे वातावरण निर्माण झाले.
या लेझीम पथकाच्या यशामागे अनेकांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः श्वेता चारखा  कविता मंत्री  यांनी महिलांना लेझीम तसेच गरब्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली   काजल मालपाणी संगीता पेटकर, डॉ. सोनाली बाहेती, गौरी मेंडसे, वैद्य, ओवी मेंडसे, पद्मजा बंटेवाड, रेखा जोशी, गायत्री जोशी, नीलिमा जाधव, राठोड, माधुरी बाहेती, वैष्णवी मिसाळ, अमृता लाहोटी, वनिता मुंडे,सिद्धी मिसाळ, रिद्धी मिसाळ यांच्यासह अनेक महिलांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा विषय ठरला.
नवरात्र महोत्सवाच्या काळात सारडा रेसिडेन्सीमध्ये धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. दैनंदिन आरती, भजन-कीर्तन, गरबा, मुलांसाठी विविध स्पर्धा अशा उपक्रमांच्या माध्यमातून उत्सवाला बहुरंगी स्वरूप प्राप्त होणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, हा महोत्सव श्रद्धा, संस्कृती आणि समाजातील ऐक्य यांचा संगम घडवून आणणारा ठरणार आहे.
“नवरात्र महोत्सवाचे खरे सौंदर्य म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा उत्स्फूर्त सहभाग. महिलांनी घेतलेली पुढाकार आणि त्यांचे मेहनतीने केलेले सादरीकरण हे रेसिडेन्सीच्या अभिमानाचे कारण आहे,” असे प्रा. डॉ. तोंडाकुर लक्ष्मण नमूद केले.
सारडा रेसिडेन्सीतील दुर्गादेवीचे आगमन हे फक्त धार्मिक विधी न राहता सामाजिक व सांस्कृतिक जिव्हाळ्याचे प्रतीक ठरले असून परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
Back to top button