बीड

आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते कलश पूजन; ‘गोदा ते नर्मदा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते कलश पूजन; ‘गोदा ते नर्मदा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भामा-भीमा जलाचा संदेश नर्मदेपर्यंत; जलसंवर्धनासाठी अनोखी जलयात्रा सुरू
 पुणे / राजगुरूनगर
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ अंतर्गत ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला कडधे येथून उत्साहात प्रारंभ झाला. जलसंवर्धनाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित विशेष कार्यक्रमात भामा व भीमा नद्यांचे पवित्र जल भरलेले कलश विधीपूर्वक पूजून जलयात्रेसाठी रवाना करण्यात आले.
या प्रसंगी आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. पूजनानंतर हे कलश चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले. जलयात्रेच्या माध्यमातून पाणी संवर्धन, योग्य जलव्यवस्थापन आणि लोकसहभागाची गरज अधोरेखित करण्यात आली.
या उपक्रमातून जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती घडवून आणण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. जलस्रोतांचे जतन आणि शाश्वत वापर यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागात पाणी व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला सहाय्यक अभियंता श्रेणी-१ अश्विन पवार, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, सहाय्यक अभियंता शुभम सुसंदरे, शाखा अभियंता अमर तंडे, स्थापत्य अधिकारी संदीप भोसले, सिंचन सहाय्यक वसंत ढोकरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रोशनी सिसुदे, दप्तर कारकून राहुल कराळे यांच्यासह जलसंपदा विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जलयात्रेच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचत असून, जलसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Back to top button