संतांच्या सहवासात येणारा सामान्य माणूसही संत होतो – ना. पंकजाताई मुंडे

संतांच्या सहवासात येणारा सामान्य माणूसही संत होतो – ना. पंकजाताई मुंडे
*भाविक भक्त हिच गडाची शक्ती*
*लोकनेते मुंडे साहेब हे न विसरता येणारं तत्व*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संत वामनभाऊ महाराजांच्या ९४ व्या नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता*
आष्टी दि. ०९ —
लोखंडाला जेव्हा परीसाचा स्पर्श होतो तेव्हा त्याचं सोनं होतं अगदी त्याप्रमाणे एखाद्या संतांचा-महंताचा माणसाला स्पर्श होतो, तेव्हा तो माणूसही संत होतो, त्यात एकरूप होऊन जातो असे भावोद्गार राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई यांनी येथे काढले. सप्ताहाची परंपरा जोपासण्याचे काम भाविक भक्त करत असून तेच या गडाची शक्ती आहेत, असे सांगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी मला गडाच्या गादीचा सन्मान करण्याची शिकवण दिली, ते न विसरता येणारं तत्व आहे असंही त्या म्हणाल्या.
संत वामनभाऊ महाराज यांच्या ९४ व्या नारळी सप्ताहाची सांगता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसोबाची वाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली, त्यावेळी ना. पंकजाताई बोलत होत्या. आ. धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, प्रताप ढाकणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ना. पंकजाताई म्हणाल्या, मी याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर गहिनीनाथ गडाच्या प्रत्येक नारळी सप्ताहात यजमान म्हणून ते यावेत यासाठी गडाची एक भक्त म्हणून स्वागत करते. संत वामनभाऊ आपल्या सर्वांचे दैवत आहेत आणि ज्यांनी त्यांना दैवत मानले त्या लोकनेते मुंडे साहेबांचे स्थान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. कोणतेही संकट मग ते कोरोना, दुष्काळाचे असो की गारपिटीचे असो नारळी सप्ताहाची परंपरा जपण्याचे काम आपण सर्व भाविक भक्त करत आहात, आपणच गडाची ताकद आहात.
*मुंडे साहेब हे न विसरता येणारं तत्व*
——-
मी माझ्या बाबांचे अंत्यसंस्कार करताना शपथ घेतली होती की, त्यांचे नाव जगाला विसरू देणार नाही. कारण गडाच्या गादीचा सन्मान करण्याची, संतांच्या विचारावर चालण्याची शिकवण त्यांनी मला दिली. दऱ्या- खोऱ्यात काम करणाऱ्या वंचित, उपेक्षित ऊस तोडणाऱ्यांच्या कष्टांना न्याय देण्याची, त्यांच्या हातात चार अधिकचे पैसे येण्याची शिकवण, तुमच्या लेकीचे शिक्षण फी-मुळे अडत असेल तर ती फी भरण्याची, गरीबाच्या लग्नाला मदत करण्याची दानत त्यांनी मला दिली म्हणून मी त्यांचे नाव जगाला विसरू देणार नाही. मुंडे साहेब हे न विसरता येणारं तत्व आहे. वरून देव जरी खाली आला आणि तुम्हाला म्हणाला, त्यांचे नाव विसर तरी तुम्ही ते विसरू शकणार नाहीत. त्यांना विसरणे म्हणजे तुम्हा आम्हाला दिलेले संस्कार, ओळख विसरण्यासारखे आहे असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.



