बीड
भंडाऱ्यात पनीरच्या नावाखाली मोठा घोटाळा; १ मेनंतर थेट धडक कारवाई!

भंडाऱ्यात पनीरच्या नावाखाली मोठा घोटाळा; १ मेनंतर थेट धडक कारवाई!
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा:- भंडारा जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलमध्ये सुरू असलेल्या पनीरच्या नावाखालील फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महागड्या पनीरऐवजी स्वस्त चीज ऍनालॉग वापरून ग्राहकांची सर्रास दिशाभूल केली जात असल्याचे स्पष्ट झाले असून प्रशासनाने आता थेट कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
पालक पनीरसारख्या लोकप्रिय पदार्थांमध्ये पनीरऐवजी चीज ऍनालॉग वापरला जात असूनही मेनू कार्डमध्ये त्याचा कोणताही उल्लेख केला जात नाही. बिल तपासणीतही चीज ऍनालॉगला पनीर म्हणूनच दाखवले जात असल्याने ग्राहकांची उघड फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अंतिम इशारा देत १ मे २०२६ पूर्वी मेनू कार्डमध्ये पनीर आणि चीज ऍनालॉग यांचा स्पष्ट व स्वतंत्र उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. तसेच आस्थापनाच्या दर्शनी भागातही याबाबत माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
याशिवाय सर्व संबंधित संघटनांना त्यांच्या सदस्यांना तातडीने सूचना देण्याचे आदेश देण्यात आले असून उत्पादन, विक्री आणि वापर यामध्ये पनीर व चीज ऍनालॉग यांची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
१ मेनंतर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे,पाटील यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, भंडाऱ्यातील अन्न व्यवसायावर आता प्रशासनाची करडी नजर रोखली आहे. सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे यांनी सर्व व्यावसायिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
“पनीरच्या नावाखाली फसवणूक थांबवा, नाहीतर थेट कारवाईला तयार रहा” , प्रशासनाचा इशारा; भंडाऱ्यात अन्न व्यवसायात मोठी खळबळ!


