बीड
राक्षसभुवन येथील कथित घरकुल-वाळू प्रकरण पावसाळी अधिवेशनात गाजणार?

राक्षसभुवन येथील कथित घरकुल-वाळू प्रकरण पावसाळी अधिवेशनात गाजणार?
गोदापट्ट्याचा वाघ आ. विजयसिंह पंडित प्रश्न उपस्थित करणार असल्याची चर्चा; महसूल व पोलीस विभागात खळबळ
गेवराई | अंकुश आतकरे 9850280544
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे घरकुल योजनेच्या नावाखाली कथितरित्या झालेल्या गैरव्यवहाराची चर्चा आता तालुक्याबाहेरही पोहोचली असून हे प्रकरण आगामी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
स्थानिक स्तरावर होत असलेल्या चर्चेनुसार, काही लाभार्थ्यांच्या नावांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व साठा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात कथित “सिंडिकेट” कार्यरत असल्याचाही आरोप विविध स्तरांतून केला जात आहे. त्यामुळे महसूल विभाग तसेच चकलांबा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, संबंधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अद्याप ठोस आणि सर्वसमावेशक कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक चर्चेनुसार, शेंबडे नावाच्या ऑपरेटरने काही प्रकरणांतील जबाबदारी स्वतःवर घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामागे कोणाचा दबाव होता का, तसेच कोणती आर्थिक तडजोड झाली का ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी गोदापट्ट्यातील ग्रामस्थांकडून होत आहे.
तसेच, तहसीलदार खोमणे रजेवर असल्याने विविध चर्चांना उधाण आले असून, या काळात संबंधित कागदपत्रे व पुराव्यांच्या सुरक्षिततेबाबतही काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे, असे काही अधिकारी राजकीय नेत्यांच्या व आपल्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नसून, आगामी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यास संपूर्ण प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



