बीड

सिग्नल प्रकरणात कारवाई, पण १३ कोटींच्या बसस्थानक गळतीकडे दुर्लक्ष; दुहेरी मापदंड जिल्हाधिकाऱ्यांचा ‘विवेक’ कधी जागा होणार? कंत्राटदारावर कधी गुन्हे दाखल करणार?  :- डॉ.गणेश ढवळे

सिग्नल प्रकरणात कारवाई, पण १३ कोटींच्या बसस्थानक गळतीकडे दुर्लक्ष; दुहेरी मापदंड जिल्हाधिकाऱ्यांचा ‘विवेक’ कधी जागा होणार? कंत्राटदारावर कधी गुन्हे दाखल करणार?  :- डॉ.गणेश ढवळे

बीड (दि.०३):शहरातील ६४ लाख रुपये खर्चाच्या हायटेक सिग्नल कोसळल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांनी दिले असतानाच, १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या गळती प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दुहेरी मापदंडाबद्दल डॉ.गणेश ढवळे यांनी तिव्र नापसंती व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणात कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून संबंधित आगार व बस व्यास्थापन आधिका-यांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, पालकमंत्री, परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी बीड यांना डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नगर नाका परिसरात अवकाळी पावसात सिग्नल कोसळल्याच्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते व काही नगरसेवकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मात्र, याच शहरातील मुख्य बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उद्घाटनापूर्वीच गळती सुरू झाल्याच्या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

डॉ. गणेश ढवळे यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी, १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी व कारवाईचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

“सिग्नल कोसळल्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे जिल्हाधिकारी बसस्थानक गळती प्रकरणात मौन का बाळगतात? त्यांचा ‘विवेक’ कधी जागा होणार?” असा सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत सोमवारपासून आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष?

बसस्थानकाच्या निकृष्ट कामाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठेकेदार-अधिकाऱ्यांची मिलीभगत?

बसस्थानकाच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी असूनही विभाग नियंत्रक अनुजा दुसाने आणि आगार व्यवस्थापक निलेश पवार या संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला पाठीशी घालत कोणतीही कठोर कारवाई केली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. “काम अपूर्ण असून दुरुस्ती केली जाईल” असे कारण देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा

बसस्थानक प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी दि.६ सोमवार रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून या प्रकरणामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button