महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;

अमरावती|मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार सन्मान सोहळा व स्नेहपूर्ण वनभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मंगळवारी खोडगाव रोडवरील सुधाकर टिपरे यांच्या शेतात हा कार्यक्रम आपुलकीच्या वातावरणात पार पडला. विविध मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांत कार्यरत पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहरराव सुने होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, अंजनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज बोंडे तसेच ठाकरे महाराज उपस्थित होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार शिवदास मते, मनोहर मुरकुटे, विकास दामेधर, जयसिंग ठाकूर, सुलेखा दामेधर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना विभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी लोकशाहीतील पत्रकारितेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. राजकारण, पोलीस आणि पत्रकार हे लोकशाहीचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ असून, पत्रकारांनी सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य केल्यास जनतेच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले. जनभावना ओळखून जबाबदारीने लेखणी वापरण्याचे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले.

त्याचप्रमाणे ठाणेदार सुरज बोंडे यांनी पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि पत्रकार हे एकमेकांचे पूरक घटक असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक प्रश्न, गुन्हेगारी तसेच जनतेच्या अडचणी योग्य पद्धतीने मांडून प्रशासनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. अंजनगाव सुर्जी परिसरात पत्रकारांनी केलेल्या सकारात्मक व जबाबदार पत्रकारितेचे त्यांनी विशेष कौतुक केले. भविष्यातही पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील सहकार्य अधिक दृढ राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पत्रकार दिनानिमित्त विविध माध्यमांत कार्यरत असलेल्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात शिवदास मते, अशोक पिंजरकर, गजानन चांदुरकर, अरुण कुलथे, मनोहर मुरकुटे, सुनील माकोडे, सुरेश साबळे, सुधाकर टिपरे, कुशल चौधरी, महेंद्र भगत, श्रीकांत नाथे, प्रेमदास तायडे, मनोज मेळे, गिरीश लोकरे, सचिन इंगळे, पंकज हिरूळकर, प्रविण तायडे, अनिल गौर, उमेश काकड, रवींद्र वानखडे, सागर साबळे, चेतन घोगरे, सचिन अब्रूक, संघरतन सरदार, मंगेश इंगळे, अब्दुल रहेमान, अब्दुल सईद, मुन्ना खान, रमेश सावळे, सुशील बहिरे, रुपेश फरकुंडे, महेश बुंदे, उषा पानसरे, सुनील पाखरे, हरिदास खंडे, युवराज डोंगरे, ज्ञानेश्वर जामनिक, शिलवंत रायबोले, अनिल तायडे, संदीप वानखडे, बाबाराव खडसे, प्रताप गवई, डॉ.राहुल अहिरे आदी पत्रकारांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे आयोजन एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष सय्यद मुजीब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. राजू खान, जिया खान, सहजाद सेठ, आरिफ पटेल, सय्यद नाजीम, मोहम्मद निसार, शेख समीरुद्दीन, जुनेद खान, अख्तर अली यांनी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मेळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश सावळे यांनी मानले.

Back to top button