बीड
बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन घाटाची दुरवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचे नाल्यात रूपांतर, नागरिक संतप्त

बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन घाटाची दुरवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचे नाल्यात रूपांतर, नागरिक संतप्त
श्रीवर्धन (संदेश घोलप)
बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन घाटाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय बनली असून ग्रामपंचायतीच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नदीचे अक्षरशः नाल्यात रूपांतर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, साचलेले घाण पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून यामुळे स्थानिक नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील अनेक नागरिकांनी सांगितले की, गणपती विसर्जनासारख्या धार्मिक परंपरेशी जोडलेल्या घाटाची अशी अवस्था होणे हे गावासाठी लाजिरवाणे आहे. विसर्जन घाट परिसरात पावसाळ्यानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट बनते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कचऱ्याचे ढीग आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे हा परिसर अक्षरशः कचऱ्याच्या डेपोमध्ये बदलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा विषय अनेक वेळा ग्रामसभेत मांडण्यात आला, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देण्यात आली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“गावातील लोकांनी या कचऱ्याच्या दुर्गंधीतून चालण्याची सवयच लावून घ्यायची का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक जण या मार्गाने रोज ये-जा करतात; मात्र परिसरात असलेल्या कचऱ्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे नाक दाबूनच या रस्त्यावरून जावे लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान अलीकडेच अनेक वर्षांनंतर श्रीवर्धन पंचायत समिती तसेच रायगड जिल्हा परिषदेत कमळ फुललेल्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नव्या सत्ताधाऱ्यांचे अभिनंदन करताना उपरोधिक प्रश्न उपस्थित केला आहे. “राजकारणात कमळ फुलल्याच्या बातम्या मोठ्या मथळ्यांमध्ये येतात; पण आमच्या बोर्ली पंचतन गावातील या कचऱ्याने भरलेल्या नाल्यात कमळ कधी फुलणार?” असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, गेली अनेक वर्षे विविध राजकीय सत्ताधाऱ्यांच्या काळात हा गणपती विसर्जन घाट कचरा आणि प्लास्टिकने भरलेला राहिला. अनेकांनी याबाबत लेखी तक्रारी केल्या, ग्रामसभेत आवाज उठवला; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गणपती विसर्जन घाट हा केवळ धार्मिक स्थळ नसून गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. मात्र घाट परिसरातील घाण आणि कचरा पाहून भाविकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
मनसे श्रीवर्धन चे सचिव सुमित सावंत यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा घाट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलला आहे. इतकी वर्षे विविध राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने हा परिसर कचरा आणि प्लास्टिकने भरलेला राहिला. आता नवीन सत्ताधाऱ्यांनी केवळ सत्तेची समीकरणे जुळवण्याऐवजी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सत्तेसाठी युती-आघाडी काय करायची ते करा; पण सर्वप्रथम जनतेच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अशा गंभीर प्रश्नांना प्राधान्य द्या. बोर्ली पंचतन येथील विसर्जन घाट परिसरातील प्लास्टिकचा कचरा तातडीने हटवून हा परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करणे आवश्यक आहे.”
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, इतकी वर्षे जर प्रशासनाने दुर्लक्ष केले असेल तर आता नवीन सत्ताधाऱ्यांनी तरी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. केवळ राजकीय घोषणांमुळे विकास होत नाही; तर प्रत्यक्षात गावातील मूलभूत समस्या सोडवल्या गेल्या तरच खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे म्हणता येईल.
गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. गणपती विसर्जन घाट परिसराची तातडीने स्वच्छता करून प्लास्टिकमुक्त करणे, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे या मागण्या आता जोर धरत आहेत.
नागरिकांच्या मते, बोर्ली पंचतन गावातही स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित विसर्जन घाट असणे ही त्यांची मूलभूत अपेक्षा आहे. आता पाहायचे म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामपंचायत या गंभीर प्रश्नाकडे कितपत लक्ष देतात आणि वर्षानुवर्षे कचऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या या घाटाला खऱ्या अर्थाने स्वच्छतेचा श्वास कधी मिळतो.
दरम्यान बोर्ली पंचतन हे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावातच जर गणपती विसर्जन घाटाची अशी दयनीय अवस्था असेल, तर विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते,” अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रश्नावर उपाययोजना करून विसर्जन घाट स्वच्छ, सुरक्षित आणि प्लास्टिकमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


