जामखेड बाजार समितीत हरभरा व तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू

जामखेड बाजार समितीत हरभरा व तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू
शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा; बाजार समितीचे आवाहन
हरभरा ५८७५ रुपये प्रति क्विंटल तर तूर ८००० रुपये प्रति क्विंटल
जामखेड प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर कृषी अभियानांतर्गत २०२५-२६ हंगामासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा व तूर या पिकांसाठी शासकीय हमीभाव नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे व संचालकांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीएफ व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात हरभरा ५८७५ रुपये प्रति क्विंटल तर तूर ८००० रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक दर मिळून आर्थिक फायदा होणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
हरभरा व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात येऊन विक्रीसाठी उपलब्ध पिकांची नोंदणी करावी. नोंदणीसाठी २०२५-२६ सालचा ऑनलाईन पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, तसेच आयएफएससी कोडसह आधार लिंक असलेले बँक पासबुक आणणे आवश्यक आहे.
शासनाने ठरविलेल्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यात येणार असून नोंदणी व खरेदीची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी ठेवण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे.



