बीड

आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत करू – उपाध्यक्ष विनोद मुळूक

आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून
पाणी पुरवठा सुरळीत करू – उपाध्यक्ष विनोद मुळूक

अमृत पाणीपुरवठा योजनेच्या उर्वरित कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच बैठक

बीड, दि.१३ (प्रतिनिधी) ः- बीड शहराची तहान भागवणारी अमृत पाणी पुरवठा योजना अर्ध्यावर पडलेली आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, तो सुरळीत करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु आहेत. अमृत अटल योजनेच्या उर्वरित कामासाठी लवकरच आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरातील सर्व मंदिरे, मस्जिद, बौध्दविहार आणि सर्वच प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी नवीन बोअर व मुबलक पाणी साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती विनोद मुळूक यांनी दिली आहे.
बीड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीची बैठक महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ८२ (५) (अ) नुसार शुक्रवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा विभागात घेण्यात आली. या बैठकीला गटनेते फारुक पटेल, खुर्शीद आलम, सादेक जमा, इलियास सय्यद, अशफाक इनामदार, महेश धांडे, राहुल गुरखूदे, शुभम धूत, सय्यद मुस्तफा, सौ.पिंगळेताई यांच्यासह पाणीपुरवठा अभियंता माने, विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली त्यानंतर नगर परिषद कर्मचारी शेख ताहेर, बाबू कवचट यांचेही दुःखद निधन झाल्यामुळे शोक भावना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
या बैठकीत अमृत पाणीपुरवठा योजनेचा आढावा प्राधान्याने घेण्यात आला. या योजनेच्या अर्धवट कामामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे. या योजनेचे उर्वरित काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी आ. विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे लवकरच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कमर्शियल अनाधिकृत नळ कनेक्शन त्याचबरोबर नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्या संदर्भात तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी व सुपरवायजर यांना देण्यात आल्या. शहरातील विविध भागातील लिकेज दुरुस्ती तात्काळ करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. नवीन अग्निशमन गाडी खरेदी करणे, जुन्या अग्निशमन गाड्या दुरुस्त करणे, अग्निशमन गाड्यात पाणी भरण्यासाठी इदगाह पाणी टाकीवर जावे लागत असल्यामुळे डिझेल व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी स्टेशनच्या ठिकाणीच पाण्याची सोय करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून याची अंमलबजावणी नगर पालिका प्रशासनाकडून लवकरच करून घेऊ अशी माहिती उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती विनोद मुळूक यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.

Back to top button