बीड
आज बीडमध्ये शेतकऱ्यांच्या एल्गार! दुष्काळाचा पार्श्वभूमीवर आ.रोहीत पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

आज बीडमध्ये शेतकऱ्यांच्या एल्गार!
दुष्काळाचा पार्श्वभूमीवर आ.रोहीत पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन
बीड दि.२३ (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात झालेल्या अत्यंत अपुऱ्या पावसामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. खरिपाची पिके हातची गेल्यामुळे आणि पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र असंतोष आहे. याच दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बीड शहरात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रोश मोर्चाला बीड मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हक्कासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता अत्यंत भीषण आहे. शेतकरी अडचणीत असताना शासन आणि विमा कंपन्या मूग गिळून बसल्या आहेत. शेतकऱ्यांचा हा आवाज शासनाच्या दारी पोहोचवण्यासाठी आ. रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा कोणत्या एका पक्षाचा नसून, संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर (मल्टीपर्पज ग्राउंड) येथे सर्व शेतकरी बांधव एकत्र जमणार असून, तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आ.रोहीत दादा पवार, प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना व बीड मतदारसंघातील व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या आंदोलनात शांततापूर्ण मार्गाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होऊन शेतकऱ्यांची एकजूट दाखवून देण्याचे आवाहन केले आहे.



