📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दुष्काळी सावट: ५ फुटांवरील गणेश मूर्तींचे विसर्जन न करण्याचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे भावनिक आवाहन

दुष्काळी सावट: ५ फुटांवरील गणेश मूर्तींचे विसर्जन न करण्याचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे भावनिक आवाहन
अंबाजोगाई प्रतिनिधी , बालाजी देशमुख;यंदा पावसाने ओढ दिल्याने अंबाजोगाई शहरातील बोरूळ तलावात पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर, गणेश मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी पाच फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे तलावात विसर्जन करू नये, असे भावनिक आणि प्रशासकीय आवाहन अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, पोलीस निरिक्षक शरद जोगदंड आणि मुख्याधिकारी प्रियांका टोंगे उपस्थित होते.
प्रशासनाची पर्यायी व्यवस्था
नगरपालिका आणि प्रशासनाच्या वतीने बोरूळ तलाव येथे विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून तीन क्रेन आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र, तलावात पाणी कमी असल्याने मोठ्या मूर्ती पूर्णपणे बुडणे कठीण आहे. त्यामुळे पाच फुटांच्या आतील मूर्तींचेच विसर्जन तलावात करावे, तर त्याहून मोठ्या मूर्ती मंडळांनी स्वतःकडे सुरक्षित ठेवाव्यात किंवा मूर्तिकारांना परत कराव्यात, अशी विनंती नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे.
घरगुती बाप्पांसाठी कृत्रिम तलाव
घरगुती गणेशोत्सवाची सांगता करताना भाविकांनी शहरातील चार कृत्रिम तलावांचाच वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळाच्या या कठीण काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून बाप्पाला निरोप देताना श्रद्धेसोबतच वास्तवाचे भान जपावे, अशी अपेक्षा महसूल, पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Back to top button