बीड

जवळा सबस्टेशनसाठी ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरची मागणी

जवळा सबस्टेशनसाठी ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरची मागणी

अजिनाथ हजारे यांचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील जवळा येथील ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्रावर सध्या १ एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यरत असून वाढती लोकसंख्या, शेती पंपांची संख्या तसेच नव्या वीज जोडण्यांमुळे या उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात भार वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पंपासाठी पुरेशा दाबाची वीज मिळत नसून अनेकदा रात्री-अपरात्री सिंचन करावे लागत आहे. कमी व्होल्टेजमुळे मोटारी जळणे, फ्यूज उडणे तसेच वारंवार वीज खंडित होणे अशा समस्या निर्माण होत असल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर जवळा सबस्टेशनसाठी ५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असल्याचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ रामभाऊ हजारे यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना दिले आहे.
यावेळी मारुती रोडे,माजी उपसरपंच गौतम कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य किसन सरोदे, सोसायटीचे संचालक राजेंद्र हजारे, सतिष हजारे, संकेत हजारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी काम सुरू करण्यात आले होते. मात्र सध्या ते अचानक बंद झाले असून मंजूर असलेले काम का थांबविण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन हे काम पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत लवकर निर्णय घेऊन जवळा परिसरातील शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी व्यक्त केली आहे.
Back to top button