तीन वसतिगृह,एकच अधिक्षक , जबाबदार कोण ?… तोही आठवड्यातून एकदाच!

तीन वसतिगृह,एकच अधिक्षक , जबाबदार कोण ?… तोही आठवड्यातून एकदाच!
रैगिंगप्रकरण गाजले… तरीही अधिक्षक बेफिकीरच!
जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील शासकीय मुलींचे वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह आणि
संत भगवान बाबा उसतोड कामगार वसतिगृह या तीनही शासकीय वसतिगृहांमध्ये सध्या व्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला आहे. अधिक्षकाच्या सततच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना राहण्यापासून ते जेवण व सुरक्षेपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या तिन्ही वसतिगृहांचा प्रभार अनिल गर्जे यांच्याकडे असून, नियमांनुसार त्यांची २४ तास उपलब्धता आवश्यक आहे. मात्र, गर्जे हे अहिल्यानगर येथे वास्तव्यास असून, केवळ आठवड्यातून एकदाच जामखेडला भेट देतात, असा आरोप आहे.
रैगिंग प्रकरणानंतरही हलगर्जीपणा सुरूच
सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध वसतिगृहात घडलेली रैगिंगची घटना ही संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. २१ एप्रिल रोजी ८वीतील विद्यार्थ्यांना ९वीच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना दोन दिवसांनंतर अधीक्षक व मुख्याध्यापकांच्या लक्षात आली. त्यानंतर मुख्याध्यापक शोमा कांबळे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. परंतु, अद्याप अधीक्षक गर्जे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
सामाजिक असंतोषात वाढ; आंदोलनाची चेतावणी
या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे पालक, स्थानिक नागरिक व सामाजिक संघटना प्रचंड नाराज झाले असून, वसतिगृह व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र भटक्या-विमुक्त जाती-जमाती विभागीय अध्यक्ष पांडुरंग माने यांनी सांगितले की, “जर लवकरात लवकर सुधारणा झाली नाही, तर समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
समाज कल्याण विभागाची उडवाउडवीची भूमिका
याबाबत विचारले असता, अहिल्यानगरचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण कोरंगटीवार यांनी सांगितले की, “अनिल गर्जे यांच्याकडे सध्या तात्पुरता अतिरिक्त प्रभार आहे. त्यांची उपस्थिती का नाही, याबाबत माहिती घेतली जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल.



